सांग माझी होशील का ?
साथ मला तू देशील का ?
मी असा मी तसा मी ग कसा.
ह्या वेगळं तू माझ्यात काही बघशील का?
मी आहे जसा, तसा स्वीकारशील का ?
ह्या आयुष्याच्या प्रवासात, तू माझा सांगती होशील का ?
सांग माझी होशील का ?
साथ मला तू देशील का ?
जगायचं आहे मला तुझ्या सोबत, अग प्रिये, ह्या जगण्याला एक दिशा देशील का?
मी आहे जरा वेंधळा, गबाळा, अनसेटल
नाही तुझ्या अपेक्षेत उभा मी आज, अग प्रिये तुला हवा तसा मला घडवशिल का?
ह्या उन्नाडाला उजेडात आणशील का?
सांग माझी होशील का ?
साथ मला तू देशील का ?
“मनु मी काही मुलांचे फोटो आणि माहिती तुझ्या टेबलवर ठेवली होती, तू बघितली का ग? “ बाबा मानसीला सकाळी नाश्त्याच्या टेबलवर म्हणत होते.
“बाबा, यु नो ना, I want a complete settle and dashing man, like you. मी बघितले, कुणीही catchy वाटलं नाही, मला निघायचं आहे, माझी मुलं वाट बघत असतील.”
मानसी बाबांचं काहीही न ऐकता तिच्या क्लास साठी निघून गेली. मानसीच BSC झालेलं, आणि ती जवळच्या टीवशन क्लास मध्ये गणित शिकवत होती. घरी तिच्या लग्नाच्या विचार होता, पण मानसीच्या अपेक्षा भारी होत्या, होतीही दिसायला सुंदर. मग ती प्रत्येक मुलाला नकार द्यायची. वर्षभरापासून तिचे बाबा आणि आई तिच्यासाठी वर शोधण्यात व्यस्त होते. नात्यातल्या आणि काही बाबांच्या मित्रांनी काही स्थळ घरापर्यंत आणली होती, काहीना ती पसंत होती पण मानसीने कुणालाच होकार दिला नव्हता. तिच्या अगदीच जवळच्या मैत्रिणीला अमेरिकेत राहणारा, गर्भ श्रीमंत आणि रग्गड कमावणारा नवरा मिळाला होता. तर ऐकिला एकुलता एक आणि मोठ्या दुकानाचा मालक, मानसीने ते सगळं अगदीच जवळून बघितलं होतं मग तिच्या अपेक्षा त्याहूनही अधिक होत्या. तिच्यामते ती एकटीच आणि लाडात वाढलेली, शिकलेली, सुंदर होती मग तिचा तो अधिकार होता की तिला होणारा नवरा तिच्या अटीत बसणारा पाहिजे होता. आणि एकही अट बसली नाही की सर्रास नकार देवून मोकळी व्हायची. आई बाबानाही जरा आवडायचं नाही पण मुलीच्या प्रेमात तेही तिला बोलत नव्हते.
पण आज मालती मानसीची आई वैतागली होती, “काय हो, जरा समजवा तुमच्या लाडाच्या लेकीला.”
“मालती तू माझ्यापेक्षा जास्त चांगलं समजावू शकतेस.” बाबा पेपर चाळत म्हणाले.
“हो का, आता हेही माझ्यावर आलं. येवूद्या आज तिला घरी, तुम्ही मध्ये बोलू नका, आयता नवरा हवाय तिला, आणि मग त्या नवऱ्याने काही ऐकल नाही तर मग ही येणार रडत घरी.”
आई कुरकुरत कामाला लागली. तिनेही अगदीच चाळून मुलांचे बायो डाटे वेगळे केले होते, तिला सारेच मुलं मानसीसाठी योग्य वाटत होते. दुपारी तिच्या बहिणीचा फोन आलेला, मग तिलाही सर्व सांगून तिने तिलाही बोलावून घेतलं. समोरच्या वाड्यात मोठी जाऊबाई राहत होती तिने तिलाही आवर्जून आज घरी यायला सांगितलं, जरासा विषयही कानावर टाकला. ते तर मोठी आई आणि मोठे बाबा होते मानसीचे, दोघही यायला तयार झाले.
आईने आज मानसीची माइंड वाश करण्याची तयारी केली होती. मानसीचे नखरे सगळेच जाणून होते मग मानसी कशी आहे हे सगळ्यांना माहित होतं पण तिला कुणीही दुखवत नव्हतं ते तिच्या लाडामुळे, कारणही तसचं होतं, त्यांच्या संपूर्ण घरात मानसी एकटीच मुलगी होती, मोठ्या वडिलांनाही दोन्ही मुलं होते, मालतीच्या बहिणीलाही मुलंच आणि नंदेलाही मुलंच, मग काय सर्व मानसीची हाजी हाजी होती.
मानसी आज केसांना स्ट्रेट करून आली होती, ती घरात शिरून आल्याआल्या आईला ओरडून सांगणार होती. पण हॉल मध्ये येताच तिचे शब्द जिभेवरून मागे परतले, मोठे बाबा समोर दिवाणखान्यात आराम करत होते. ती हळूच आईच्या खोलीकडे वळली, आता बोलणार होती तर तिची नजर मोठ्या आईवर पडली, तिची आई आणि मोठी आई खोलीत रद्दी बरोबर करत होत्या. ती काहीही न बोलता निघाली तर तिला मावशी स्वयंपाक खोलीत चहा ठेवतांना दिसली. मावशीशी तिचं मस्त जमायचं, येवून बिलगली तिला, “मावशी, आज इकडे तू, आणि हे बघ मी माझे केसं कसे केलत… सरळ मस्त ना ! बघ ग.”
“हो हो मनु, खूप सुंदर दिसत आहेत.”
“तू आज इकडे कशी.”
“यावं लागलं तुझ्याशी बोलायला, घे चहा आणि चल ताईच्या खोलीत.”
मानसीने चहाचा ट्रे घेतला आणि ती मावशीसोबत आईच्या खोलीकडे निघाली, मोठे बाबा हॉल मधून ओरडले, “आली का माझी मनु.”
“हो मोठे बाबा, चहा घेता का तुम्ही.”
“पाणी आण मला आधी.” मानसीने चहा चा ट्रे मावशीच्या हातात परत दिला आणि पाणी घेवून मोठे बाबांकडे गेली. बाबांनी पाणी घेतलं मग चहा घेतला. मनु हळूच तिथून उठून आईच्या खोलीत आली.
आईने आता सगळे मुलाचे बायोडाटे खाली ठेवले, “मनु सकाळी खूप बोलणं झालं नाही जरा सांग ग सविस्तर का नाकारलंस ह्या सर्वांना, म्हणजे आम्हाला कारण कळेल आणि नंतर आम्ही योग्य मुलगा समोर ठेवू काय ताई.” आई मोठ्या जाऊला बघत म्हणाली.
मानसी बसली, मग अलगत हळूच ऐक बायो डाटा उचलला, “आई हा बघ ह्याला पगार कमी आहे ग, आणि घरात लहान बहिण आहे अजून लग्नाची. दिसायला आहे देखणा पण मला नाही वाटत हा काही करू शकेल.”
मग दुसरा उचलला, “हा ना मस्त दिसतोय, पगार आहे याला चांगला, पण हा इंटरनशिनलं कंपनीत नाही ग, विदेशात जाण्याचा काही योग नाही ह्याचा. आणि ह्या कंपनीचे शेअर घसरले आता…”
“हा उत्तम वाटतो पण हा काय करतो ग, सगळं तर ह्याच्या वडीलांचं आहे वाटते… मुलगा कसा मेहनती असावा…”
मानसी ज्या ओघात बोलत होती ते कुणालाच पटलं नव्हतं, कारण त्या सगळ्या मुलांची बारीक चौकशी बाबांनी आणि आईने केली होती.
मावशी आता म्हणाली, “मनु तुला मावसाजी कसे वाटतात.?”
“अरे काय मस्त आहेत ते, त्यांच्या सरखा कुणी मिळाला ना तर मी एका पायावर लग्न करेन.”
मावशी हसली, “हो का! अग पण ते आज तसे आहेत, तुला माहित आहे आम्ही पळून जबून लग्न केलं होतं. मावसाजी कडे नोकरीही नव्हती ग, पण हिंमत होती सर्व काही करण्याची, एकमेकांच्या हिम्मतीने आम्ही विश्व तयार केलं.”
“पण ते तुझं किती ऐकतात ग मावशी, तू म्हणशील तेच अंतिम असतं त्यांना.”
“मग! माझी येवढ्या वर्षाची मेहनत आहे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिले ना, कुणीच विश्वास ठेवला नव्हता, मी ठेवला आणि आज बघ काय नाही आमच्या कडे, अग तुझी आई आता पाच वर्षा पासून माझ्याशी बोलत आहे. सगळच तुला लग्ना आधी मिळालं तर तुझं ग काय त्यात… मग तुला तो काहीही बोलेल. कसही वागवेल…आणि काय मग तेच …करून सर्व हाती धुपाटण.”
“आता तुझ्या आई आणि बाबांना बघ, अरेंज लग्न आहे त्याचं, ताईला जीजू बघायला आले होते तेव्हा, जीजू नुसते एका छोटश्या दुकानाचे मालक होते. दोन बहिणी होत्या लग्नाच्या आणि आई आजारी असायची त्यांची.
किती केलं असेल ना तिने, आज बघ स्वतः चा मोठा बिजनेस आहे, किराणा मालाचे मोठे व्यापारी आहेत, गाडी गडी सर्व आहे, आणि घरात कुणाची चालते. तुझ्या आईची… कारण तिने उभ केलंय त्यांना. लहान मोठ्या कुरुकुरी सर्वांमध्ये असतात ग पण जोडीदाराची साथ महत्वाची असते. लग्न करणं खूप सोपं आहे, मुलगा चांगला, घर उत्तम, गाडी, गडी, बंगला आणि काय काय ते सर्व असूनही रंक होतांना बघितले आहे मी. “
“अग सुरुवात थोडीच असते ना ग, पण ती वाढण्यासाठी दोघांना सतत कार्यरत असावं लागतं. त्याला संसार म्हणतात, तुला तर आयता संसार हवाय.. तुझं काय ग राहणार त्यात, कोण तुला किंमत देणार, शोभेची बाहुली व्हयाच आहे तुला?
“नाही मावशी तसं नाही…”
“मग कसं ? हे सर्व मुलं उत्तम आहेत, आणि त्यांना सर्वांतम्म तुला बनवायचं आहे. आयुष्य चालेंज असतं, घेशील नाही तर काय जगशील, ज्या मुलाला तू घडवणार नाहीस तो तुला कधीच किंमत आणि सन्मान देणार नाही. कारण तू जे देवू शकतेस ते तर तो कुठूनही मिळवू शकतो मग तुझी काय किंमत फक्त घरात राहणारी म्हणून ..अरे बायको होण्यासाठी बायकोची भूमिका निभवावी लागते. समजलं! चल त्या सगळ्या मुलांना एकदा भेट आणि नंतर तुझा निर्णय घे. तुझ्या निर्णयाला आम्ही कुणीच नाकारणार नाही पण फालतू करणं देवू नकोस. “
“मंग काय त वं पोरी, कायले मायले अन बाबापाले तरास देवून राहिलीस, आमच्या वेळेले हे असं पोरीले विचरण असतं तर बापा बापा… तुह्या मोठा बाबा आज अंसी एकराचा मालक असता कावं, अन तुह्या वाहिनीन हे असं तुह्या भावासाठी त कसं झालं असतं पोरी, त्यान तर काय ते SAP क CP च्या कलास साठी नौकरी सोडली होती दोन वर्ष. अन माह्या सुनीन नौकरी केली. आज पाय दोघबी अमेरिकेत नौकरी करतत. सुखी आहेत दोघं. लायनायचं लगन लावलं होतं तेवा वाटलं नव्हत माले अन बाबाले क ती पोरगी टिकल म्हणून, पण तू पायतस ना तुझा लहान भाऊ कसा सुधरला, हो जरास नाही पटत आमचं तिच्या सोबत पण पोरगी गुणाची आहे. माह्या लाय्ण्याले लय धीर देते. मग तो तिचं ऐकल नाही तर काय बाई ….” मोठी आई सहज म्हणाली.
साऱ्यांच ऐकताना मनु परत तिने वर वर बघून टाकून दिलेले मुलांचे बायो डाटे बघत होती, आणि तिच्या हातात मित चा बायो डाटा आला, सोबा फोटो होता तिने पालटून बघितला, लिहिलं होतं mba झालंय, दोन वर्ष खाली होतो, सहा महिने झाले नौकरी करतोय, जरा वडिलांची संपत्ती आहे पण माझं स्वतः च काहीच नाही, पण खूप काही करण्याची हिंमत आहे, मी एकटा करूही शकतो पण तू साथ दिली तर त्या सगळ्या मिळणाऱ्या गोष्टीवर राज्य तर करशीलच पण माझ्या मनाची राणी होशील…..बघ पटत असेल तर नंबर दिला आहे, भेटूया. जरा प्लानिंग करू या.. सोबत चालूया… मग माझी होशील का? साथ मला तू देशील का?”
मनु हसली, “ममा, हा मुलगा पसंत आहे, मी भेटायचं म्हणते….”
मावशी, आई, मोठी आई साऱ्याच चकित झाल्या. समोरच्या खोलीतून मोठे बाबा उठून आले, चष्मा डोळ्यावर करत त्यांनी मनूच्या हातून मितचा फोटो घेतला. “मने, माले घेवून चाल तू चाललीस त. म्या काई बिन बोलणार नाय…म्हणजे मज्जा वं….आमच्या वेळस नवत मने असं …अन तू माही लाडाची पोर…”
“मोठे बाबा, पण मी जाणार बघा भेटायला, आमच्या वेळी आहे हे …आणि तुम्हाला पण नेणार नाही, आता लग्न भेटून लग्न करायचं म्हणते.” मानसी तयार व्ह्यायला निघून गेली.
आईने मोठा सुस्कारा दिला आणि सर्वांनी आज इकडेच जेवणाचा बेत केला.
कथा कशी वाटली नक्की कळवा ..आणि माझ्या नव नवीन कथा वाचण्यासाठी पेजला लाईक नक्की करा.
©उर्मिला देवेन
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव!]
https://www.facebook.com/manatlyatalyat