Marathi blogs, मनातल्या कथा

घुसमट… ‘द अनहर्ड व्हॉइस’

दिवसभराचे  काम करून थकलेल्या माधवीचा डोळा पलंगावर पडल्या पडल्या लागत होता, सुमेध त्याचं  काम करत खोलीत होताच, तिच्याकडे बघूनहि त्याने लक्ष दिलंच नाही, नुसती मान हलवली, आणि भाव अशे होते जणू तेच सारे शब्द बोलून गेले होते, कसली थकते ही, करते तरी काय दिसवसभर… माधवीचे डोळे लागत होते तरीही तिने एक शब्द म्हटला,  “झोपते रे मी.. “ दोन मिनिटही लागले नाही तिला झोपी जायला.

सुमेध मात्र बराच वेळ काम करत होता, रात्री दोन वाजले होते. त्याने लॅपटॉप बंद केला. तो पलंगावर आला, माधवीच्या अगदीच जवळ आला, तिच्या शांत पडलेल्या चेहऱ्यावर तो बोटं  फिरवू लागला, माधवीला जाग आली, झोपेतच ती त्याला म्हणाली, “झोप आली आहे रे, नको ना आता काही.”

सुमेध तिला जवळ ओढत म्हणाला, “मला झोप येत नाही आहे ना, तुला कसली ग झोप येते…काम तर काहीच नसतं तुला, दिवसभर मुलं शाळेत गेल्यावर झोपतेसच ना? “

तो तसाच तिला छेडत राहिला, कधी ओठांवर तर कधी पोटावर … माधवीने त्याचा हात धरला, “सुमेध राहूदेना … झोप मोड होईल रे माझी आणि मग झोप लागायची नाही.”

“आणि मला झोप येत नाही त्याच ग काय … “ तिच्या कानाला स्पर्श करत तिच्या कानात तो बोलला.

माधवीने कडा पलटला आणि सुमेधला राग आला, “ये, भाव नको खाऊ, करतेस काय ग अशी, चार जीवाचं करून काय थकतेस म्हणतेस…जुन्या काळी बायका डझनभर लोकांचं करायच्या तरी नवऱ्याला नाही म्हणत नव्हत्या.”

माधवीने त्याच्या जरा जास्त बोलण्याने डोळे उघडले, “हळू सुमेध, मुलं उठतील.”

“पण मी जागा आहे त्याचं काय.”

असं म्हणत त्याने तिला अंगावर ओढलं, “नाहीच म्हणतेस तू … कधी हो म्हटलं आहे बऱ्या बोलाने… येवढ्या वर्षात.”

माधवी काहीच करू शकली नाही, नाही म्हणत म्हणत ती सुमेधमय झाली… तिचा नकार त्याने ऐकलाच नाही.

सुमेध काही क्षणात ढाराढूर झोपला, घोरायलाही लागला पण माधवीला झोप येईना. कडा पलुटून पलटून तिने उरलेली पहाट काढली पण उत्तर काही मिळेना कि का आपण स्पष्ट नाकारू शकलो नाही, उत्तर सगळीच होती माझ्याकडे तरीही का नाही दिलीत.  

सकाळी अलाराम वाजला आणि ती उठली, मुलांचा नाश्ता, दुपारच्या जेवणाचा डब्बा, सुमेधाचा नाश्ता, त्याचा डब्बा, त्याचा चहा मुलांचं दूध सर्व करण्यात सात वाजले. तिचा मोर्चा मुलांच्या खोलीत वळला, मुलांना प्रेमाने लाडाने उठवण्यात वेळ गेला, मुलं उठली आणि घरात कल्लोळ माजला, दोन्ही मुलाची बाचाबाची ब्रश करण्यापासून तर डाईनिंगच्या टेबलपर्यंत सुरूच होती, त्यात सुमेधच ओरडणं सुरूच होतं, “माझा आजही शर्ट इस्त्री नाही माधवी, करतेस काय ग तू ..आधी तो कर.”

इकडे डाईनिंगवर मस्ती करणारे दोन्ही मुलं भांडत होती, “मम्मा हा बघ मला मारतो आहे,”

“ मम्मा ह्याने माझं दूध सांडवलं.”

 माधवी शर्टाला इस्त्री करून डायनिंग टेबलवरच दूध पुसायला आलेली, तिला जरा अंधारी आली, तिथेच बसल्या असणाऱ्या सुमेधाचा तिने हात पकडला, त्याने तो झटकला, “ये कळत नाहीका कपडे घाण करशील माझे.”

“सुमेध जरा गरगरतय रे, झोप झाली नाही माझी… नेहमीच होतंय रे असं.. जरा डॉक्टरकडे जाईल म्हणते आज संध्याकाळी.”

“नाही नाही आज नको, आज फ्रायडे आहे, आज माझ्या एका मित्राला मी जेवायला बोलावलं आहे.. तू नंतर जा, घरीच असतेस, जायचं ना, दिवसभरात जा, पण सांध्यकाळी मला तू घरी हवीस ….”

“सुमेध आज नको ना रे, नाही जमायचं मला, बाहेरून बोलवू का मी जेवण.?”

“काय ? मग घरी कशाला बोलवतोय मी, तो ऐकटाच असतो बाहेरचं खातो नेहमी.. ते काही नाही.”

माधवी गप्पच झाली.. तिला गप्प बघून सुमेध म्हणाला, “मी शब्द दिलाय त्याला,,तू उद्या जा डॉक्टरकडे…”

असं म्हणत सुमेध निघून गेला ऑफिसला.

मुलं शाळेत निघून गेली, माधवीने चहा गाळला, कप घेऊन बसली,  दारावर बेल वाजली, नळाच्या पाण्याच बिल आलं होतं ते हातात घेत कामाला सुरुवात केली, रात्रीच्या हालचालीने मांड्या दुखत होत्या पण मन ऐकत नव्हतं, कुरकुरत काम सुरूच होतं.. तिचं तिला ऐकत नव्हती. विचारात होती सुमेध किती स्प्ष्ट बोलला मी का नाही बोलू शकले, रात्रीही तसंच झालं आणि  सकाळीही … मी का नाही बोलू शकत. मला जे नकोय ते मी का करते? का प्रतिकार करत नाही? मी दिवसभर बिझी असते पण का कुणाला दिसत नाही? घुसमटलेला तिचा जीव तिला ऐकतही नव्हता…

घर आवरून झालं होतं तर लहान मुलगा घरी आला, त्याची शाळा दीड पर्यंतच, तो आल्यावर त्याच करण्यात, अभ्यास घेण्यात वेळ गेला, मग त्याचा क्राफटिंगचा क्लास, नेण्या आणण्यात वेळ गेला. मग मोठा मुलगा घरी आलेला, त्याला खायला करून देण्यात, अभ्यासात पाच वाजले. माधवी परत स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी बसली. संध्याकाळी आठच्या सुमारास सुमेध मित्रांना घेवून आला, सकाळी एकच मित्र येणारं बोलला होता पण त्याने सोबत तीन मित्र आणले होते.

माधवीने मुलांना त्यांच्या खोलीत पाठवलं आणि सक्त ताकीद दिली पण ती कसली ऐकतात त्यांच्या गोंधळात तिचा आवाज त्यांना पोह्चलाही नसवा. इकडे हॉल मध्ये मित्रांनी ड्रिंक्सची पार्टी सुरु केली, सुमेधने ग्लास घश्याखाली ओतला होता, तो किचन मध्ये आला, मागून त्याने माधवीला गळ्यावर कीस केलं, माधवी दचकली. सुमेध म्हणाला, “अग भजी आणि अंडा भुर्जी  कर ना?”

“सुमेध तू स्वयंपाक बोलला होता, मी जरा जास्तच केलेला पण आता अंडी नाहीत घरी आणि वेळ झालाय बराच… “

“नाही ना ग, तू कर काहीतरी मला अंडा भुर्जी खायची आहे…. ड्रिंक्स सोबत हवं ना काही.”

त्याने असं म्हटल्यावर माधवी काहीच बोलू शकली नाही आणि बोलूही शकणार नव्हती घरात मित्र होते सुमेधचे. गुमान अंडी घेण्यासाठी निघून गेली.

एका खोलीत मुलं आणि हॉल मध्ये पार्टी, इकडे मुलांना हवं नको बघा आणि इकडे सुमधचे फर्मान ह्या गोंधळात तिला ती सापडत नव्हती, “हो आले, आणते लवकर, आलेच, आले रे बाळा, आलीच सुमेध…” ह्या एवढ्या बोलण्या पलीकडे तिला काही आवाज आहे हे तिला माहितच नव्हतं.. तिच्या मनाचा स्वतः साठीचा आवाज कुठेच नव्हता. एक स्पष्ट नकार हे सगळं थांबवू शकलं असतं पण तो नकारच घुसमटत बाहेर निघाला होता जो साहजिकच अनहर्ड झाला.

पार्टी मस्त झाली म्हणत मित्र निघून गेले पण माधवी मात्र गुदमरली होती, तिची घुसमट तिला कळत नव्हती. सर्व आवरून परत खोलीत आली तर सुमेधने ओढलं,  तिच्या केसांना सावरत तिच्या शरीराला तो स्पर्श करत होता, माधवीच अंग तापलं होतं.. तिला तो स्पर्श किळसवाना वाटत होता. नको ना रे सुमेध म्हणून ती ओरडत होती पण त्याने तिला गच्च मिठीत धरलं होतं, तो दारूचा वास आणि ती त्याची तिच्यासाठीची धुंदी तिचा आवाज त्याच्या पर्यंत पोहचू देत नव्हती आणि तिची घुसमट अजूनच वाढत होती. त्या सुमेधच्या मोठ्या मोठ्या श्वासांमध्ये माधवीचे श्वास गुदमरत होते…. आणि तिच्या ओठातून फुटणारा मनाचा आवाज परत अनहर्ड व्हॉइस झाला होता\

कथा वाचण्यासाठी धन्यवाद, आपण कथा वाचणारे जरी ह्या परिस्थितीत नसलो तरीही ही परिस्थिती कायम आहे, सामन्य वर्गातच नाही तर हाय सोसायटी मधेही आहे. प्रत्येकाची परिस्थिती कथेतल्या सारखी राहू शकत नाही… वेगवेगळी राहू शकते. पण अनहर्ड व्हॉइस हा कुठे ना कुठे असतोच … बघा पटलं तर …आणि तोडा तो ….न गुदमरता …

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

जोडीदार कथा मालिकेचे सर्व भाग इथे वाचा https://www.manatalyatalyat.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE?&max-results=8

“प्रेमात तुझ्या माझ्या” ही माझी पुस्तक दुसऱ्या वर्षगाठी निमित्त आजपासून पुढच्या पाच दिवसासाठी (दि. ऑक्ट ४~ ८) Kindle वर फ्री केलीली आहे. तरीही ह्या संधीचा पुरोपूर उपयोग घ्या. वाचा, आनंद घ्या आणि अभिप्राय नक्की नोंदवा.

Kindle वर पुस्तक वाचण्यासाठी कृपया खालील प्रक्रियेचे (Steps) अनुसरण करा.

१. खालील लिंक ला click करून पुस्तक फ्री विकत घ्या. (पैसे लागणार नसल्याने काही चिंता करू नका.)

२. पुस्तक Kindle apps वरच वाचता येईल म्हणून आपल्या मोबाईल वर Kindle apps आवश्यक आहे.

Kindle apps नसल्यास Kindle apps download करा (Google Play किंवा App Store – Apple वरून फ्री download करता येईल.)

Kindle apps ला access amazon account नी करता येतो.

३. पुस्तक आपोआप Kindle apps च्या kindle library मध्ये दिसेल.

वाचा, आनंद घ्या आणि अभिप्राय नक्की नोंदवा.

उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com

Facebook Comments

You may also like...