Marathi blogs, नाते संबन्ध, पालकत्व, प्रेरणादायक, मनातल्या कथा

सूनबाईचा बायोडाटा!

सुहासिनी आज मुलींचे फोटो घेवून बसली होती, लग्न जुळवून आणणारे माधव काका आले होते ना! सुहासिनीचा तोरा असा कि तिला तर तिच्या मुलासाठी, मुलगी दिसायला विश्व सुंदरी हवी होती, वागणुकीने शांत, संस्कृती जपणारी, मोठ्यांचा मान ठेवणारी, मुख्य म्हणजे शिकलेली, आणि घराण्याला शोभणारी . खेड्यातली मुलगी नकोच असा शब्दच होता तिचा, का तर म्हणे तिला राहणीमानाचा सेन्स नसतो. समोर बसलेल्या माधव काकाला मुलींबद्दल सांगून घाम फुटला होता. सुहासिनीने काही मोजके फोटो बाजूला केले, त्यातला एक फोटो उचलला, “काका हि मुलगी किती शिकली आहे हो?”

“अहो हि का! सायन्स पदवीधर आहे, शिवाय विदेशात जावून आली आहे…काय ते पेपर प्रेझेंट करतात ना, त्याच्यासाठी, आपल्या अनमोलला अगदीच तंतोतंत आहे. त्याचही प्रेझेन्टेशन स्कील भारी आहे. जमेल जमेल दोघंच.”

“काय काका! जमेल जमेल! हि सावळी आहे का? फोटो बनावटी वाटतोय, ओठ काळे दिसतात, म्हणजे सावळी आहे हि, काय पण आजकालच्या पोरी… असा केमेऱ्याचा फ्लॅश मारून नुसत्या तोंडाचा फोटो काढतात. छे!!”

“बऱ, तिला ठेवा खाली, हि बघा, नाजूक आहे. सुंदर आहे.”

“नाजूक? अहो मेकअप करतात मुली आजकालच्या….आणि तुम्हाला म्हणून सांगते, तेही जमायला हवं.”

“हो, सुहासिनी बाई, जरा बायोडाटा बघा ना तिचा, घराणं बघा, घरंदाज घरची मुलीगी आहे हि.”

सुहासिनि बायोडाटा हातात घेत, “बघू.. अरे, वडिलांनी एकटी वाढवली आहे का हिला? नाही वाटतं

आई …………”

“जावूद्याना, कशाला भूतकाळ खोदता, माती टाका आता त्या भूतकाळावर. आई विना पोरं आहे, माया लावा तुम्ही. जीव लावेल तुमच्यावर.”

“अस कसं! जम्नाच्या गाठी पडणार आहेत. तिचा भूतकाळ माहित हवा… माती टाका म्हणजे काय!”

“अहो, तिची आई घरातून निघून गेली होती आणि मग काही वर्षाने तिच्या मरणाची बातमी कळली होती.”

“अरे बापरे! अगबाई! घरात चढ उतार होतचं असतात… नको बाबा.. संस्कारी बाया घराला धरून राहतात. जात नाही सोडसाड करून.”

“अहो, सुहासिनी बाई, आपल्या अनमोलला शोभेल हो, माझ्या पाहिनितली आहे, रंग पण गव्हाळ गोरा आहे तिचा. एकदम उठून दिसेल जोडी.”

“अहो माधव काका, माझा मुलगा काय सावळा नाही…. जरा वडिलांसारखा आहे, म्हणूनच मला सून गोरीपान हवी.

म्हणजे नातवंड कशी गोरी गोमटी होतील.”

“राहिलं, मग हि कशी वाटले आपल्या अनमोलसाठी. आपल्या घरात्त येवढी गोरीपान तर मी अजून पहिली नाही, हीरा आहे. रूपवान, उंच, गणितात गोल्ड मेडलिस्ट आहे. आईला बऱ नसतं म्हणून नौकरी करत नाही. घरी शिकवण्या घेते. काय ते ५० -५० च्या चार बेचेस आहेत तिच्याकडे.”

“अय्या अस!” सुहासिनीने फोटोला नेहाळत उत्तर दिलं.

नंतर त्यांनी तिचा बायोडाटा हळूच उचलला, वाचतांना चेहयावरचे भाव बदलत होते. आणि तिची नजर तिच्या वयावर पडली, “काय हे माधव काका! अनमोलसाठी बायको हवी आहे, बाई नाही. अहो हि आपल्या अनमोल पेक्षा तीन वर्षाने मोठी आहे. आणि तश्याही मुली लवकर मॅच्युअर होतात. मोठी दिसेल हि नंतर….”

“अहो, हल्ली चालतं, दोन – तीन वर्षाने काही फरक पडत नाही.”

“नाही.. कसं नाही! पुढे मागे मुलं व्हायला प्रोब्लेम झाला तर….? लग्न काय दहादा करायचं आहे. मला मुलगी कमीत कमी दोन वर्षाने लहान हवी हो काका.”

“बऱ, तसही लग्न कार्य सर्वांच्या मर्जीने हवं.. जसं तुम्हाला पटेल. पण एक विचरू का?”

सुहासिनीने परत शेवटचा फोटो हातात घेतला, “हो नक्की.”

“नाही, राग मानू नका, पण अनमोलला जर कुणी पसंत असेल तर..?”.

सुहासिनी जरा शांत झाली आणि म्हणाली, “मग काय काका! आलेया भागाशी असावे सादर…. त्याची आवड गोड मानून घेवू, अजून काय! पण बनेतोपर्यंत माझे प्रयत्न नाही सोडणार, माझ्या पसंतीची सून आणण्यासाठी….काय! कसं! पटलं?”

आता माधव काका हसले आणि म्हणाले, “अहो हि मुलीगी, अहो हि, जिचा फोटो तुमच्या हातात आहे, ती नौकरी करते, मुंबईत राहून आहे. अनमोलला टक्कर देणारी आहे… त्याचे विचार जुळतील हिच्याशी. पण….”

“पण काय काका….?”

“माधवपेक्षा उच्च आहे. आणि कदाचित सर्वच बाबतीती… जावूद्या. आपल्याला नाही जमायची.”

सुहासिनीने खूप वेळ विचार केला, कधी तिच्या फोटोकडे तर कधी बायोडाटा कडे बघत राहिली, नंतर खूप नाराज होवून तिचा फोटो माधव काकाला परत दिला, “काय काका! पुढच्या वेळेस जरा उत्तम मुलींचे स्थळ घेवून या..! तुम्हाला तर माहीतच आहे माझी पसंत आता…”

माधव काका हसले, काकाने त्यांचा पसारा उचलला आणि निघाले, निघतांना त्यांच्या मनात विचार घुमत होते, “आजही मुलींसाठी काहीच बदलल नाही, मुलीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून जरी डिग्री मिळवली असली तरी तिचा लग्नाचा बायोडाटा उत्तम नसतो. लोकांना सून शिकलेली हवी पण ती घरच्यांचं ऐकणारी, संस्कृत, मान हलवणारी आणि घर नावाच्या खुंट्याला बांधल्या राहणारी गाय हवी असते. कुणाच्यातरी मेहनतीने वाढवलेल्या फुलाला मुडासगट तोडून, घर नावाच्या फ्लॉवर पॉट मध्ये सजवायचं असतं आणि त्या फुलांकडून अपेक्षा केली जाते कि त्यांनी सदाकदा कुठल्याही परिस्थितीत ताजं टवटवीत दिसावं आणि सुगंध पसरवावा.”

त्यांनी आपल्या पिशवी कडे नजर टाकली, पन्नास फोटो आणि बायोडाटा होते… त्या सगळ्या मुलींची लग्न काकाला जुळवून आणायची होती…. प्रत्येकीच्या वडिलांना उत्तर द्यायचं होतं…. स्वतःच्या मुलीला अकाली गमावल्या मुळे तीच लग्न जुळवू शकले नव्हते ते, मग ह्या सर्व मुली त्यांच्या आहेत असंच होतं त्यांचं. आणि प्रत्येकीसाठी ते जोडीदार शोधणारच होते कारण त्यांचा विश्वास आजही होता कि जोड्या स्वर्गात बनतात पण शोधाव्या इथे लागतात… मग त्यांचं ते शोध कार्य कधीच थांबणार नव्हतं. 

विचारात त्यांचा फोन वाजला, “हो माधव काका बोलतोय… हा निघालोच.. मग काय! … अहो तुम्हाला पसंत पडणारच अश्याच मुलींचे फोटो घेऊन फिरत असतो मी.. आलोच अर्ध्या तासात घरी.”

परत एक बायोडाटा जुळवण आणण्यासाठी काकांची धडपड परत सुरू झाली होती…

प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि पुढच्या कथेसाठी पेजला लाईक करा.

माझ्या कथा फक्त मनातल्या तळ्यात पेजवर…. वाचण्यासाठी आजचं पेज लाईक करा. तुम्ही ब्लॉग हि subcribe करू शकता.

अधिक कथा इथेही वाचू शकता https://www.manatalyatalyat.com/

“जोडीदार “ हि कथा मालिका इथे वाचू शकता https://www.manatalyatalyat.com/2020/08/blog-post_23.html

फोटो साभार गुगल

©️उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

Facebook Comments

You may also like...