दुपारची वेळ होती, ममता तिच्या बहिणीला फोन करायला लागली, लहान बहीण मनू, तिची लहान मुलगी आजारी होती, असं कळालं होतं ममताला. ममता नावाप्रमाणे मायाळू, सालस, सतत सभवतालच्या लोकांची काळजी घेणारी. दुपारच्या निद्रेनंतर तिचा वेळ सर्वांची चौकशी करण्यात जायचा. हा .. हे मात्र खरं, तिला कुणी स्वतः हुन फोन करत नव्हतं. कुणाला फोन लावला कि समोरचा तिलाच म्हणत असे, अग आता लावणारच होती तुला फोन … पण अजूनतरी कुणी तिला स्वतःहून चौकशी साठी फोन लावला नव्हता. तिचा नवरा तिला टोमणा नेहमीच मारायचा, “तुला करतं का ग कुणी फोन? साऱ्यांना फोन करतेस. तुझ्याकडे बरा वेळ असतो. बाकीचे बिझी असतात.”
आणि ती उत्तर द्यायची, “अहो, गरज पडली कि फोन सारेच करतात, साधा चौकशीचा फोन करायला त्या व्यक्तीला आयुष्यात महत्व द्यायव लागतं. मी नसेल त्यांच्यासाठी महत्वाची पण मला सर्वच महत्वाचे आहेत.”
ममताने फोन लावला, “हॅलो, मनू.”
“अग, ताई आता मी फोन हातात घेतलाच होता बघ… तुला करायला. “
“बरं, कशी आहे राणी आता. “
“ताई .. तुला आता काय सांगू … तुला तर माहीतच आहे. काल मी बाहेर गेले होते, आणि हा कोरोना काही पिच्छा सोडणार नाही आहे आपला अजून तरी दोन-तीन वर्ष. बाहेरून आली, तर बघते राणी आणि बाळूने घराच्या अंगणात पाण्याचा चिखल केला होता. राणी पूर्ण ओली झाली होती.. झाली सर्दी! ग बाई भीतच ना? “
“हो, पण आता बारी आहे ना ती.”
“आता तुला काय सांगू, ऐकते काय ग पोरं, नाकाचा शेम्बुळ हातानि पुसते आणि अजूनही खेळत आहे, काय करावं बाई ह्या पोरांचं! काही समजत नाही, तुला तर माहीतच आहे, माझे हे काही काही लक्ष देत नाही… जळलं मेलं ते लॉकडाऊन, नवरा काही कामाचा नाही ग ताई, घरात राहून मुलांवर लक्षही देत नाही. नुसत्या मीटिंग्स आहे म्हणतो आणि कामात राहतो.. सारं घेऊन जा जागेवर.”
“कामं असतं ग, वेळ मिळाला कि करतो तो.”
“आता तुला म्हणून सांगते, काही नाही, नुसता कामचोरपणा, आता बघ लोकांचे नवरे कामं करतात ना … माझं तर नशीबच फुटकं. वाटलं होतं, आता तरी नवरा सोबत राहील. पण कायच काय ग, नुसता माझ्या सवतीला सामोरं घेऊन बसतो. “
“ग आता हे काय, काहीही बोलतेस.”
“laptop ग!”
“मनु जास्त होतय.मॅनेजर आहे तो. शंभर कामं असतील त्याला आणि आता लॉकडाउनमुळे घरून कामं सोपं नाहीच ग. “
“हो असेलही. तुला तर माहीतच आहे, मला ना कंटाळा आला सर्वांचा, तुला ग माहीतच आहे, काही काही बरोबर होत नाही….सुरु आहे ग कसतरी. “
तेढ्यात तिच्या मुलांची बाचाबाची सुरु झाली
“आई हि बघ ना माझं पेंटिंग फाडते आहे. “
“आई…. नाही मी काहीवच केलं नाही, आधी याने, माझे केंस ओढले. “
“नाही आई हि खोटं बोलते. “
ममता मनूला म्हणली, “मनू मुलांकडे बघ आपण नंतर बोलू, काळजी घे ग बाई. “
“आता तुला काय सांगू, कुणी काळजी घेत नाही घरात नुसता गोंधळ सुरु असतो. “
ममताने फोन ठेवला आणि तिच्या कमला लागली, सारखा तिच्या मनात तिच्या बहिणीचा विचार घुमत होता, “काय हे हिला कधीही फोन करा नेहमी रडतच राहते. कधीच बोलण्यात संतृष्टता दिसत नाही. कुणाचं एकूण घेत नाही आणि विच्रारातही नाही. ”
महिना झाला होता, घरची कामवलीबाई संगीता आलेली, लॉकडाऊन मुळे तीच घर ते फक्त ममताच्या आधारानेच चालत होतं, नवरा नव्हताच तिला, सहज बोलतांना ममताने विचारलं, “मुलं शाळा करतात का ग? “
“हो करतात ना, त्यांचा अभ्यास ते करत असतात, आमच्याकडे आयफोन नाही, पण काय ते शाळा नुसती ऑनलाईन करून होत नाही ना, अभ्यास हवाच, मग करतात दोघ बी, शाळेच्या गुरुजीला भेटून सांगितलं तर म्हणाले होते, मुलांना अभ्यास करायला लावा. बाकीच बघू. आता शाळा सुरु नाहीत तर घरीच शाळा शाळा खेळतात माझी पोरं. दोघेही मला मदत करतात अन मी इकडे आली का अभ्यास करतात.”
“तू मास्क तयार करायला घेतले होते ना ? “
“हो करतो ना, त्यातही माझी लेकरं लय मदत करतात, घड्या पाडून कॅरी बॅग मधी टाकतात. मज्जा येते घरात मग.”
सांगतानाही तिचा चेहरा खुलला होता, खरं तर त्यांच्या खाण्याचेही वांदे होते, एक वेळचं खात असतील आणि ममता कडून उरल सूरलं घेऊन जात असेल तेच. पण काही तक्रार नव्हती. एखाद घर जास्त शोधावं म्हणून तिचा प्रयत्न सुरु होता पण ह्या कोरोना मुळे लोकं काम देत नव्हती पण जराही तिने ममताला म्हटलं नव्हतं कि पगार वाढवायला म्हटलं होतं. तिची परिस्थिती कुणाकडून लपली नव्हती पण तिच्या ओठांवर ती येत नव्हती. आणि तिने स्वतःचे प्रयत्न सोडले नव्हते .
त्या दिवशी ममताला जरा मनूच्या घराकडे काम होतं मग वेळ काढून ती तिच्या घरी गेली. तिला बघताच मनू तिला बिलगली, आणि सांगायला लागली, “बरं झालं ग तू आली, तुला तर माहितीचं आहे, माझं बाई जाणंच होतं नाही कुठे, आणि हे तर काही कामाचे नाही. ह्या मुलांनी चांगलंच मला त्रासवलं आहे. आता तुला काय सांगू, सगळं मलाच करावं लागते, हा बघ किती पसारा केलाय सर्वांनी, उचलणार कोण तर मी, तुला म्हणून सांगते, जरा जीवाला शांतता नाही माझ्या. “
ममता आली हे ऐकताच माधव, मनूचा नवरा स्वयंपाक घरातून बाहेर आला, टॉवेलने हात पुसत होता, ममता त्याला बघून म्हणाली, ” काय माधवरावं जेवण झालं का? “
“हो तर, हे काय भांडी घासलीत मी आता! तुम्ही बसा, गप्पा करा, माझा लचंअवर संपला, जातो मी आपल्या खोलीत, मिटिंग आहे माझी. काही लागलं तर सांगा. “
ममता जरा मुलांसोबत बसली, मनू चहा ठेवत होती, तिची ती नेहमीची किरकिर सुरू होती तर दारावर बेल वाजली, मनूचा मुलगा उठला आणि दार उघडलं, सामोरं एक पिशवी घेऊन माणूस उभा होता, त्याने ती पिशवी मुलाच्या हातात दिली आणि निघून गेला. पिशवी साफ़ करून मुलाने त्यातलं सामान काढलं. सामानाची पाकीट नीट साफ केलेत.
बिस्किटाचे पुडे, चॉकलेट्स, चिवडा, चकलीचे पॉकेट्स होते. आतल्या खोलीतून माधवचा आवाज आला, “मनू सामान आलं का ग? “
मनू ओरडली, “हो आलं. “
परत सुरु झालं, ताई तुला म्हणून सांगते, ह्यांना ना काही कळत नाही. आता काय गरज होती ह्याची, whats up करून बोलावलं असणार, घरी होतं ना. मी म्हणते गरज काय!’
माधव परत हॉल मध्ये आला आणि म्हणाला, “ताई मुलांसाठी चॉकलेट घेऊन जा, छोट्या पिल्लूला चकली आवडते ना मुद्दाम मागवली मी.”
ममता, “अहो माधव, काय गरज होती.”
“गरज नव्हती हो, पण प्रेम माझं माझ्या मुलींवर म्हणून मागवले, आता बाहेरचं गेलो असतो पण मिटिंग आहे माझी. पण आठवणीने घेऊन जा बरं. आणि मुलींनी खाल्ले कि फोटो पाठवा मला.” आणि तो हसत परत खोलीत निघून गेला.
सगळं ममताला सुरळीत दिसलं, काहीच चुकल्यासारखं नव्हतं मनूकडे पण मनुची ती नेहमीची किरकिर ज्याने ती लोकांची सहानुभूती घायची आणि घरी मात्र मस्त मजेत असायची.
ममता मनूच्या जवळ गेली, तिला म्हणाली, “चल, मला काही काम आहे जरा जवळचं “
“पण मी का येऊ, तुला तर माहीतच आहे ग”
तिला मधातच काटत ममता म्हणाली, “चल ग, तू आताच म्हणाली ना तुला कुठे जायला मिळत नाही म्हणून. घे मास्क आणि सॅनिटायझर सोबत आणि चल बघू, माधव बघतो मुलं, त्याचीही आहेत ते, असते त्यालाही काळजी. तू चल.”
“ताई आता तू एवढं म्हणतेस तर चल पण … तुला काय सांगू, मला ना कुठेच जायला मिळत नाही ग.”
ममताने ऑटो वाल्याला फोन लावला आणि त्या ऑटोत बसून संगीताकडे गेल्या. ऑटो वाल्याला तिथेच जरा थांबायला सांगून त्या दोघी संगीताच्या घराकडे वळल्या.
मनु जरा ममताला हात लावत म्हणाली, “ताई हा ऑटो वाला, नाही ..तुला आता काय सांगू …”
“सांगू नको …काही नाही, माझ्या ओळखीतला आहे, सध्या लॉकडाऊन मुळे फोन केला कीचं ऑटो आणतो, तो बघ ऑटो पुसतो आहे. काळजी नको करू मी त्याला ओळखते. सवाऱ्या घेत नाही तो त्यालाही भीतीच न कोरोनाची. !”
संगीताने दार उघडलं, आधी सॅनिटायझर हातात दिलं आणि आतमध्ये घेतलं. तिच्या त्या दोन खोलीच्या घरात खूप प्रसन्न वाटत होतं. कशीतरी मनू ममताला टेकून बसली. संगीताच्या घरची परिस्थती खूप वाईट होती. जुन्या कपड्यातले तिचे मुलं मास्कचा घड्या घालत होते. मोचकं सामान, दोरीवर टांगलेले कपडे, एक अगदीच हळू फिरणारा पंखा. खोलीभर नजर टाकली ती सर्व घर एका नजरेत दिसतं होतं. संगीताच्या घरात काही चहा करायला दूध नव्हतंच. पण तरीही तिने आनंदाने चहा विचारला. घरात सर्व कशे आहेत ह्याची चौकशी केली, उलट मनुची ओळख करून दिल्यानंतर तिने तिच्या मुलीची चौकशी केली. मनूला तिच्या बोलण्याच आणि वागण्याचं आश्चर्य वाटलं.
ममताने काही सामान तिच्यासाठी आणलं होतं ते तिने संगीताला दिलं. आणि निघण्यासाठी उभी झाली. संगीताने तिचे खूप आभार मानले. ममता आणि मनू तिथून निघाल्या आता मनूला राहवलं नाही, “ताई, तू मला तिथे का घेऊन आली.? तुझी कामवाली बाई होती ना ती ?”
त्यावर ममता तिला म्हणाली, ” हो, माझ्या घरी काम करते, संगीताची परिस्तिथी तू नजरेने बघितली पण तिने तोंडातून शब्दही काढला नाही, किंवा तिच्या परिस्थितीचे पोवाडे तिने गायले नाही. रडत गराण सांगत बसली नाही, तिचा नवरा दोन वर्ष झाले मरण पावला, त्याचे काय ते पैसे मिळणार होते तेही मिळाले नाही. पण कुणासमोर सहानुभूतीसाठी रडत नाही. सगळं करते हसत. काल माझ्या घरून ती जरा आंबलेला भात घेऊन गेली होती,. तो भात खराब झाला होता हे मला नंतर कळलं. पण तिला विचारलं तर म्हणाली, “ताई मी त्याला मस्त फोडणी दिली.”
आय गंमत ना … अशी परिस्थिती आहे तिची तरीही सगळं हसत करते आणि कधीच नकारात्मक बोलत नाही. तिच्यशी बोललं कि प्रसन्न वाटतं.”
मनूला घरी सोडून ममता घरी त्याच ऑटोने निघून गेली. मनूला तिचं आता काय सांगू ह्यातलं नेमकं काय ते गवसलं होतं. आपल्याकडे सर्व असूनही आपली सतत किरकिर सुरु असते हे तिला कळालं होतं.
दोन दिवसाने तिने आठवणीने ममताला फोन केला तेव्हा ममतालाच आश्चर्य वाटलं. आणि तिच्या बोलण्यात बराच बदल ममताला दिसला, आज मनू ममताला तिच्या बद्दल विचारात होती. नि जराही तिचा तो डायलॉग वापरला नाही … आता तुला काय सांगू ..तुला तर माहीतच आहे.
मित्र मैत्रिणींनो, सगळ्यांना नुसती किर किर सांगत फिरणे म्हणजे सहानुभूती जोळने असते. शिवाय लोकांनाही दुसऱ्यांच्या गोष्टीत इंटरेस्ट असतो ..मग विचारात बसतात आणि हसतात एकांतात ..तेवढाच तो त्याचा विरंगुळा …. काही तर सर्व सुरळीत असतांनाही सांगत असतात .. का कुणास ठाऊक .. आणि अश्या लोकांची मज्जा घेणारे भरपूर असतात बरं का, आणि सांगणारे ऐकणारयांना त्यांचे मित्र मैत्रिणी समजतात.. . बघा पटलं तर … नाहीतर आता तुम्हाला मी काय सांगू … तुम्हला तर माहितच हे ….हाहाहा हा …
©उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
नवीन कथेसाठी पेजला लाईक किंवा फॉलो करा.