Marathi blogs, Relationship, नाते संबन्ध, प्रेम कथा

तुझ्या माझ्या प्रेमात हा ‘अहंकार’ कसा रे ?

आज रेणूला माहेरी येवून तीन महिने पूर्ण झाले होते. पंधरा दिवसांनी तिच्या लग्नाची वर्षगाठ होती. रेणू आणि रोहितचा प्रेमविवाह होता. दोघेही एकाच कॉलेज मध्ये होते. कॉलेज संपल्या नंतर रोहितला उत्तम नौकरी लागली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी लग्नाला नकार दिला तर सरळ कोर्ट मॅरेज करणार अशी धमकीच दिली दोघांनी. मग काय शुभमंगलम सावधान झालंच. दोघांच्याही मर्जीच लग्न होतं. सुरवातीचे सर्वच दिवस आनंदात गेलेच. रेणू रोहितची पसंत होती आणि घरच्यांची तिला अड्जस्ट करायला कुरकुर होत होती. रेणू रोहितच्या प्रेमापोटी सगळं सहन करत आंनदी राहण्याचा प्रयत्न करत होती. हळू हळू सासरच्या लोकांच्या अपेक्षा वाढत होत्या.

रेणू दिवसभर काम करून घरचंही सगळं सांभाळायचा प्रयन्त करत होती. रोहीतही तिला मदत करत होता. कहीदा तो त्याच्या आईच्या रागाला समोर जात होता. सुरुवातीला रेणूच्या प्रेमापोटी तो आई वडिलांना आणि बहिणीला बोलायचा. पण कालांतराने त्याच्याही अपेक्षा वाढतच गेल्या आणि आता तो रेणूला गप्प करत होता. रेणूने सून म्हणून सगळंच सांभाळावं हेच त्याच म्हणणं असायचं. बाकीच्या बायका कसं सगळंच करतात असं म्हणूंन तो त्याच्या आईची बाजू घेवू लागला होता. उलट दोघांच्याही घरच्या रीती परंपरा वेगवेगळ्या होत्या. रेणू आणि रोहित दोघेही त्या सांभाळतांना स्वतःला अड्जस्ट करत होतेच. रोहित कितीही आईची, त्याच्या घरच्याची बाजू घेत असला तरी तो रेणूवर प्रेम करत होता. तिच्यासाठी तो घरातल्यांना समजवायचा, नाहीच समजले तर मग स्वतः एखाद्या गोष्टीला पुढाकार घेत होता.

त्या दिवशी अगदीच हलकीशी गोष्ट होती, रेणूने सासूचे कपडे धुतलेच नव्हते आणि ती ऑफिसला निघून गेली होती. अचानक रोहित लवकर घरी आला आणि त्याच्या आईने त्याला हि गोष्ट सांगितली. रेणू घरी येताच त्याने तिला जाब विचारला, “तू आईचे कपडे बाहेर का काढून ठेवले? मशीन मध्ये का धुतले नाही ..?” रेणूच तो ऐकायला तयारच नव्हता….खरं तर, तो कंटाळला होता आणि त्याची अपेक्षा आता रेणूंकडूनच होती. उलट रेणुचीही अशीच अपेक्षा होती कि ह्याने समजून घ्यावं. जस तो लग्नाआधी तिला समजून घ्यायचा. तेव्हा ती रागावली तरी तो ऐकून घेत होता आणि आज तो ऐकायला तयार नव्हता. खरं तर सासूची साडी सुती होती आणि अगदीच नवीन होती. साडीचा रंग दुसऱ्या कपड्याला लागू नये म्हणून रेणूने ती मशीन मध्ये टाकली नव्हती.

रोहितला नंतर कारण कळलेलं पण दोघांमध्ये अबोला होता. दोघानांही कळत होतं पण वळत नव्हतं. रेणू सतत विचार करत होती कि रोहित किती बदललाय, काहीच अड्जस्ट करत नाही. मीच का सर्व करावं. रोहित समजत होता कि रेणू साठी तो घरातल्या सर्वाना अड्जस्ट करायला लावतो आहे आणि तोही तिच्यासाठी जमेल तसं करतोच आहे.मग हि का असं वागते? घरी नॉन वेज बनत नसतांनाही आता तिच्यासाठी एक दिवस घरात बनत होतं. आणि सर्व स्वयंपाकघर रोहित स्वतः साफ करत होता. मग रेणू का अडजेस्ट होत नाही आहे… अश्या अनेक विचारांनी रोहित त्रस्त होता.

दोन दिवसानंतर, सकाळी, रेणू घरकामात मग्न होती. अचानक रोहित ने आरडाओरडा सुरु केला. रेणू लगेच धावत गेली,

“हे काय, तुला सांगितलं होतं दोन दिवसाआधी, माझी कलाईन्ट मिटिंग आहे म्हणून, माझा सूट तयार ठेव म्हणून.. हे बघ इथे कुठलाच पांढरा शर्ट धुवून प्रेस नाही. तुझ्या सारखंच समजतेस काय..? रंगीबिरंगी साड्या घालून जातेस. माझ एक स्टेटस आहे.”

“काल जरी आठवण करून दिली असती तू तरी मी केलच असत ना सगळं रे.. निघून गेलं रे डोक्यातून.. ”

“हो ना… महत्वाच्या गोष्टी बऱ्या निघतात. फालतू गोष्टी साठी तुझ्याकडे वेळ असतो नाही?  ”

“बरं, मी आता करून देते .. शांत हो.”

“काय आता करून देते? त्या ब्लेझरच्या पिन्स पण तुटल्या होत्या. नवीन आणल्या का तू ..? मला वाटलं तू हुशार आहेस .. ”

आता मात्र रेणूचाही पार भडकला ..

“जास्त बोलू नको हा… नौकरी काय तू एकटाच करत नाही. आणि तू करायचं ना मग. माझी तयारी करून देशील का माझी अशी अर्जेंट मिटींग असली तर? आणि मी काय काय बघणार? घरी एवढे लोक असतात, करावं ना त्यांनीही .. बाकी गोष्टीत कशी लुडुबुडू होते. मुलाचं करता येत नाही का?”

“रेणू … जिभीला आवर .. बायको आहेस माझी .. तुलाच सांगणार ना ?”

“अगदीच, पण कामच मला सांगायची… बाकी तर घरच्यांना सांगायचं असतं. ”

“जास्त बोलते आहेस .. ”

“नाही.. खरं बोलते आहे ..लागलं का, कि कुणाला लागू नये म्हणून रागावतोस ”

“रेणू, गप्प हा …. इथे तू नि मीच बोलतो आहे ना?”

विषय कुठचा कुठे गेला होता .. आणि मग रेणूने रागात स्वतःची बॅग भरली .. रोहित तिच्या कडे बघत बसला .. सासू रेणूला समजावत होती पण रोहित एकही शब्द बोलत नव्हता. रेणूने बॅग धरली आणि ती निघाली. तिला कहीदा वाटलं कि रोहित थांबवेल पण रोहित तर स्वतः तयार होत होता. रेणू घरच्या गेट समोर वीस मिनटे ऑटो साठी उभी होती पण रोहित तिला वळवायला घरातून आलाच नाही. शेवटी ती ऑटोत बसली आणि निघून गेली. लागलीच रोहित बाहेर आला, त्याला ती दिसलीच नाही. खरं तर तो तिला बाईक वर बसवून ऑफिस मध्ये सोडणार होता. ति बाहेर न दिसताच त्याला खुप राग आला. त्यानेही बाईक काढली आणि ऑफिस साठी निघून गेला. वाटेत रेणूला रोहित ऑफिसला जाताना दिसला आणि तिला त्याचा आणखीनच राग आला. वाटलं, मी घर सोडून निघाले आणि ह्याला ऑफिस सुचते आहे. त्याला माझी गरज नाही तर मलाही नाही …

रेणू, माहेरी होती आणि ह्या मधल्या काळात तिला तिच्या चुका कळल्या होत्याच पण पुढाकार कसा घेणार. घरचे तिला म्हणायचे पण ती उत्तर देत होती, “मला काही स्वाभिमान आहे कि नाही .. मीच का पुढाकार घेवू. ”

रोहीतलाही कळून चुकलं होत कि रेणू बरच अड्जस्ट करत होती त्याच्या घरात, पण त्याच्यासाठी तर ती घर सोडून गेली होती, मग तो का बोलणार आधी?  रेणू माहेरी तिच्या आईला ह्या वयातही बाबासाठी बरच काही करतांना बघायची. तिच्या मोठया बहिणीकडेही राहून आली, बहीण आणि जिजाजीच नातं जवळून बघितलं होत तिने. काहीसं कळून चुकलं होतं कि रोहित खूप करायचा तिच्यासाठी. तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचू देत नव्हताच. वाटत होतं त्याला जाऊन माफी मागावी. गच्च मिठी मारावी पण हे सर्व कळूनही वळत नव्हतं … रोहितचेही हाल अशेच होते. बाकी बायकांच्या तुलनेत रेणू किती गोष्टी घरात करत होती हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण, त्या दिवशी त्याने तिला थांबवलं नव्हतं आणि आता तिला घ्यायला जाणं अवघड आहे असच त्याला वाटत होतं…

त्या दोघानांनी थांबवत होता त्यांचा इगो … जो त्याच्या प्रेमाच्या नात्यात अलगत शिरला होता …मी ..मीच का.. करत … स्वाभिमानाच्या रस्त्याने ..

मीच का पुढाकार घ्यावा हि भावना दोघानांही तीळ तीळ तोडत होती .. प्रेमावर अहंकाराने विजय मिळवला होता .. आणि आता फक्त पंधरा दिवस राहिली होती लग्नाच्या वर्षगाठिला ..

दोघानांही एकमेकांना भेटायचं होतं पण कसं आणि मीच आधी का ? लग्नाचा वाढदिवस जवळ येत होता आणि रेणूची हुरहूर वाढत होती तिला लग्नाच्या दिवसातली तिची ती रोहितसाठीची ओढ आठवत होती. रोहितने त्याच कपाट उघडलं आणि त्याच्या लग्नाची शेरवानी अलगद खाली पडली. सोबत गाठजोडा बांधण्यासाठी वापरलेला शेलाही पडला. त्याचा लग्नातल्या हळदीचा वास तसाच होता ….. आणि रोहित बेचैन झाला. ते दोघे ज्या ठिकाणी लग्नाआधी भेटायचे तिथे तो निघाला आणि रेणूची वाट बघत होता. लग्नाआधी अशीच रेणू त्याची वाट बघत तिथेच तास न  तास बसून असायची पण तो येणार हे नक्की असायचं, पण आज… रोहित बसून होता आणि रेणू येणार कि नाही त्याला माहीतही नव्हतं. प्रत्येक येणाऱ्या ऑटोकडे तो आशेने बघत होता.

थकला होता, थकून परत जातच होता तर मागून आवाज आला .. ..”बस!! एवढीच वाट बघता येते का तुला? गोष्टी तर मोठया मोठया करतोस .. ?कसं वाटलं वाट बघून .. ?”

आणि रोहित मागे वळताच तिला गच्च बिलगून रडायला लागला .. “हो कळलं आता .. वाट बघणं किती जीवघेणं असतं ..”

आणि मग दोघानींहि  एकमेकांना माफी मागितली. अहंकाराचे दाट धुके प्रेमाच्या इवल्याश्या फुंकारिने पार पळाले होते…  प्रेमाच्या त्या स्पर्शाने अहंकाराची वेल कोमेजली होती.. दोघेही एकमेकांना बघत शांत होते पण तिथला निसर्ग ओरडून ओरडून बोलत होता ..  मग … तुझ्या माझ्या प्रेमात हा ‘अहंकार’ कसा रे ?

पती पत्नीच्या नात्यात स्वाभिमानाची जागा जेव्हा अहंकार घेत  तेव्हा काहीच उरत नाही.. स्वतःचा स्वाभिमान असावा पण अहंकाराने बहरलेले नसावा .. आपल्या नात्यात कही नाती जुळली असतात .. जी आपलं मन जपण्यासाठी आपला स्वाभिमान जपतात .. मग आपल्याच अहंकाराला बळी पडतात … असं व्ह्ययला नको ना .. वास्तविक जीवनातही अश्या अनेक कथा आपल्या जवळपास असतील ..

ह्या नात्याचा धागा ताणल्याने तुटतो .. नाजूकच असतो….

 

शुद्धलेखनाच्या चुका माफ करा 🙏

नवीन लेख/ कथा वाचण्यासाठी पेजला लाईक/ फॉलो करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोत्साहन देतील. 

©उर्मिला देवेन

धन्यवाद!!!

————————————————-

फोटो आभार गुगल

.

Facebook Comments

You may also like...