Marathi blogs, प्रेरणादायक, मनातल्या कथा

इथे मीचं फक्त तुझा आहे.

लग्न झालं आणि सर्व कसं बदललं होतं, साडी कधीही न घालणारी साडी घालत होती. आईने बजावलं होतं, घरचे म्हणे पर्यंत सलवार घालायचा नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. नजर खाली ठेवून बोलायचं, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं. सगळं काही लतिका पाळत होती. जर नवरीचे चार दिवसं नवलाईचे जगावे आणि इथल्या लोकांच्या  मनात शिरावं म्हणून तीही सगळं मनापासून करत होती. सासरच सगळं तिला आवडायला लागलं होतं.

लग्नाला दोन दिवस झाले होते घरात पाहुणे मंडळी होतीच. सर्वांना सकाळचा चहा लतिकाच्या हातूनच हवा होता, तिचा तो डोक्यावरचा पदर सावरत ती चहा देत होती. एक चहाचा ट्रे आणून झालेला आणि ती दुसरा भरून आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेलेली. समोरून राजन आला तिला गालावर हळूच टिचकी देवून हॉल मध्ये शिरला. तीही लाजली आणि कामाला लागली.

त्याने पेपर उचलला, गुणगुणत बाहेर व्हरांड्यात जावून बसला. सर्व पुरुष मंडळी बाहेर गप्पा राजनीतिक गप्पा करत चहा घेत होती.

हॉल मध्ये राजनची आई, काकू, मोठी आई, आत्या, मावशी सर्व बसल्या होत्या. चहा आणि ब्रेड खाणं सुरु होतं, काकू म्हणाली, ” लतिका सुंदर आहे ग, काय सोनं बिन काही दिलं कि नाही माहेरच्यांनी! कि बस तिला पहा आणि ….”

सासू वचकून म्हणाली, “हो, दिसते अंगावर, काय माझा तो शिकलेला मुलगा! मग हुंडा नाहीना घेऊ शकलो आम्ही, हा लग्नाच्या बैठकीतच म्हणाला, फक्त मुलगी हवी म्हणून, मग काय! पण, मुलीकडच्यांना समजायला नको. नाही! मुलाला एखादी चारचाकी गाडी किंवा एखादा फ्लॅट द्यायला हवा होता.”

“अगबाई, पैसेवाल्या घरची ना ग हि? तरी काही नाही दिलं!”

“हो ना, अहो लग्नाचा खर्चही वाटून घेतला.”

“बाई ग, कळायला नको का तिच्या वडिलांना.”

“आता कळेल ना, आता हि सासरी आहे, तेव्हा मुलाने ऐकलं नाही आमचं. “

“आता ऐकेल, मुलं लग्नानंतर आईला मान देतातं, आणि मुलगा आपलाच आहे ग, आपलं ऐकणारं नाही तर कुणाचं, ती काय आज आली घरात.”

समोर पेपर वाचत बसणाऱ्या राजनने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या. आणि चहाचा ट्रे घेऊन हॉल मध्ये येवू पाहणाऱ्या  लातीकाच्या चेहऱ्यावरचे भावही त्याने टिपले होते.

लतिकाने चहा काहीही न बोलता सर्वांना दिला. स्वयंपाक घरात परत येत असतांना तिच्या मनातले सासरबद्दलचे भाव बदलले होते. दोन दिवस कसे निघून गेलेले हे तिला जाणवलं नव्हतं पण आज तिला तिच्या भविष्याची चिंता वाटायला लागली होती. बाबा तर देणारं होते माझ्या वाटणीचं सर्व पण ह्याचं लोकांनी नाही म्हटलं, मग आता का हा मुद्दा. आणि राजन तर स्वतः नाही बोलला होता. सर्वांच्या मनात येवढं होतं तर बोलायचं होतं ना. राजनही असाच बोलणार. आता मी माझ्या बाबांना काय सांगणार. ह्या विचारांनी गुदमरली होती लतिका. किचन ओटा पुसत होती आणि सर्व समोरचं पुसट होत होतं.

राजनने पेपर गुंडाळला, सर्व पुरुष मंडळींना आत बोलावलं, त्याचा चहाचा कप घेतला आणि आता तो हॉल मध्ये येऊन बसला. काय मावशी, “कधी आहे मग राणीचं लग्न? ”

“अरे पुढच्या महिण्यात काढायचं म्हणतात जावई. तुला सांगू, मस्त मुलगा आहे रे, म्हणतोय राणीला लक्ष्मी म्हणून घरी न्यायची आहे, काहीही नको. लग्नही त्याला साधंच हवं आहे. आपली राणी आता त्या घरची राणी होणार बघ!”

“वा ग मावशी! तुझा जावई तो मस्त आणि मी वाईट, माझ्या आईला भडकवतेस. करू फोन कुणालला? तुझा होणार जावई ओळखतो मला, एक दोनदा भेटलो मी त्याला कामासाठी.”

“आणि आई आणि तुम्ही सर्व नीट ऐकून घ्या, माझ्या मागे आणि माझ्या समोर परत हा विषय नकोच. लतिकाला ह्या मुळे कुणी त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे. तुमच्यासाठी ती परकी आहे मग मीही परका होईल.

तिचा अपमान हा माझा अपमान असणार आता, मी हुंडा घेतला नाही कारण माझ्यात तिला आनंदी ठेवण्याची क्षमता आहे. तुम्ही हुंडा मागताय आणि तिला त्रास देण्याचा विचार करत आहात म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. मी कमकुवत आहे का? “

“अरे पण मुलींचाही हक्क असतोच ना वडिलांच्या संपत्तीवर!” बाबा हळूच सर्वांकडे बघत म्हणाले.

“हो मुलीचा, ते लतिका आणि तिचे वडील बघतील. आणि काही तिला वडिलांकडून मिळालं तरी ते तिचं स्वतःचं असेलं, तुझं, तुमचं किंवा माझं नाही.”

राजनच्या बोलण्याने सर्व अवाक झाले होते. मावशीला काहीसं पटलं होतं. तिने सासूची समजूत काढली. आणि निघण्याच्या तयारीला लागली. घरात काहींना कुणालाच असं बोलण पटलं नसलं तरी मुलगा होता तो घरचा त्याला कोण शिरजोरी करणार होतं. उलट कळलं होतं सर्वाना कि लतिका त्रास दिल्याने आता काही होणार नाही कारण राजन उभा होता तिच्यासमोर सर्व झेलायला.

लतिकाने सर्व ऐकलं होतं, ती धापा टाकत तिच्या खोलीत गेली आणि राजनला बिलगली, “मला माहित नव्हतं तुम्ही माझ्या बाजूने बोलला म्हणून. आता मला कसलीच चिंता नाही, तुम्ही माझ्या सोबत नेहमी असणारं ..पण आपल्या लोकांना असं बोलण्याचं धाडस? “

“माझे इथे सर्व आहेत, मी काहीही बोललो तरी ते मला दुरावणार नाहीत. इथलं प्रत्येक नातं हे माझं आहे आणि माझ्यापासून तुझ्यापर्यंत जातं. माझ्यात सर्व गुंतले आहेत.

इथे तुझं असं कुणीही नाही, इथे मीचं तुझा आहे. मी जर तुला सोबत दिली नाही तर हे सर्व तुला आपलंस करणारं नाहीत.

नवीनपणात नवीन सुरुवात असते आणि मी तुला एकटं सोडू शकत नाही. इथे प्रत्येकाला तुझ्याकडून अपेक्षा आहे आणि त्या तुला पूर्ण कराव्या लागतील. तुझी नाती तुला जुडवावी लागतील. पण त्यांना तू कळे पर्यंत मी तुला वेगळं करू शकत नाही. तुझी बाजू मी सोडू शकत नाही. कारण आता मी इथे फक्त तुझा आहे.. तुला अजून कुणी नाही.

तुझ्या सासरी सर्व माझे जवळचे आहेत पण मीचं तुझा आहे. “

लतिकाला आज वडिलांच्या निवडीवर गर्व वाटत होता. आज तिला परक्या लोकांमध्येही आपला कुणीतरी भेटला होता. कारण अजून नाती जुळायला वेळ होता पण एक नातं जुळलं होतं. नवरा बायकोचं.. जगातलं अप्रतिम नातं.. मनापासून तर तानापर्यंतच.

कथेतल्या नायकाने जशी त्याच्या आपली भूमिका आधीच ठोक केली तर कुठल्याच प्रतेक्ष जगातल्या नायिकेला सासरी त्रास होणार नाही… नाहीका .. कारण सासरी फक्त नवराच नवरीचा असतो!

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

नवीन कथेसाठी पेजला लाईक करा आणि मला प्रोत्साहन नक्की द्या !


©️उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com

Facebook Comments

You may also like...