Marathi blogs, नाते संबन्ध, प्रेम कथा, मनातल्या कथा

नात्यातला श्वास…  विश्वास !!

नातं कुठलंही असू देत …

काहीच नसतं विश्वासाविना…

नाहीतर नातं गुदमरतं ..

श्वासाविना …..

बऱ्याच दिवसांनी सुट्टी होती मग नितीन आणि नलिनी मुलीला घेवून बाहेर गेलेले. मॉलमध्ये कपडे बघतांना, अचानक तिच्याहातून सूट पडला आणि समोरच्या माणसाने तो अलगत तिला उचलून दिला, आणि क्षणभरात नजर पडताच ..

“हे .. तू इथं कशी? किती दिवसांनी भेटलीस…? आताही तशीच दिसतेस … मस्त …. माझे तर केस पिकलेंत ग “

“अरे पण तू तर…. अमेरिकेत होता ना? इकडे कसा? केस पिकलेंत ना… तू कुठे पिकलास….अजूनही हॅन्ड्सम दिसतोस रे!”

“मी इकडेच राहतो मंजुळा कॉलोनीत…”

“अरे त्याच्याच मागच्या फ्लॅट्स सिस्टिम मध्ये आमचाही फ्लॅट आहे “

“खूप बर वाटलं ..शेवटी ह्याच आयुष्यात तू मला भेटलीस.”

“हो का … मग पृथ्वी गोल आहे हि सिद्ध झालंच कि!”

दोघेही गुंग झाले होते बोलण्यात …तेवढ्यात नलीनीच्या मुलीने मम्मा हाक मारली आणि दोघेही भानावर आले …. दुरून सर्व बघणारा नितीन जवळ आला आणि नलिनी अगदीच दचकली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले होते. त्या भावातून बाहेर येवून नलीनीने नवऱ्याची ओळख करून दिली. पण त्याची ओळख करवून देतांना ती तिला होणारा आनंद जरा आतल्या आत गोठवून ठेवू पाहत होती.

“अरे..  हा माझा कॉलेजच्या दिवसातला खास मित्र .. मितेश .. खुप मैत्री होती आमची …..अगदी कसं कॉलेजमध्ये सगळंच आम्ही सोबत करायचो .. “

“मितेश, मीट माय लव्हली हसबंड नितीन”

“हाय, नाईस टू मीट यू “

“मस्त जोडी आहे हा तुमची दोघांची … शेवटी नलीनीला तिचा प्रिन्स गवसला म्हणायचं … मी तर सुटलो रे बाबा !!!”

“या तुम्ही आमच्याकडे .. तुझं कुटुंब नाही दिसत? “

“माझे आई बाबा गावीच असतात, इकडे मी एकटाच असतो “

“बायको वगैरे….”

“तू घेवून गेलास ना नलीनीला.”

” ..काय ?”

“अरे .. तो खुप वेगळा किस्सा आहे सांगेन कधीतरी … आता तर मी नलीनीसाठी खुश आहे.”

मग त्याने मोठीशी चॉकलेट नलीनीच्या मुलीला दिली आणि तिच्याशी बोलू लागला. नलिनी मात्र पार पाणी पाणी झाली होती. तिच्या मनात सारखं येत होतं कि नितीनला कसं वाटत असणार. तो काही भलतं तर नाहीना विचार करत असेल ना? काय मी वेड्यासारखी, हा दिसला आणि वाहवत गेले….सावरलं नाही स्वतःला .. .ह्या मितेशलाही हेच शहर दिसलं होतं. परत एवढ्या वर्षाने नजरभेट झाली…. माझ्या प्रिय बायकोला एक प्रिय मित्रही होता हे पचेल का नितीनला हा विचार तिला बोचत होता. नितीन मितेशशी बोलत राहिला आणि मग नलिनी हळूच शिष्टाचार करत म्हणाली, “ये आमच्याकडे वेळ मिळाला कि ..बोलू निवांत .. चल रे… वेळ होतोय आपल्याला .. पिल्लुची जेवणाची वेळ निघून जाईल.”

नलीनीच्या वागण्यातला एकदम बदल मितेशने टिपला होता … त्यालाही वाटलं .. होतंच असं .. बायकोचा मित्र कोण सहन करणार हा विचार करत असेल नलिनी नवऱ्यासाठी .. पण तिचा नवरा तसा विचार करणाऱ्यातला नाही वाटला  ..जावू देत.

घरी पोहचेपर्यंत नलिनी विचारातच होती कि आता घरी गेलं कि नितीन सगळं विचारणार आणि मग उगाच घरात वाद वगैरे होतील. आमचं किती सुंदर चाललंय. उगाच अविश्वासाचं वांर शिरणार घरात. काय अवदसा सुचली मला त्या मॉल मध्ये जाण्याची … विचार करत नलिनी घरी पोहचली. गडबडीत दारात ठेच लागून पडणारच होती तर नितीनने तिला सावरलं, “लक्ष कुठे आहे तुझं?  आता मी होतो म्हणून तू पडली नाही. येवढे श्वास वाढायला असं काय झालं?  विश्वास आहे ना तुझा! मी तुला नाही पडू देणार…. “

रात्री नितीन ने तिला मितेश बद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने, जावू दे ना, होता तो मित्र पण आता तर तूच माझं सर्वस्व आहे असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली. 

“अग, पण मी कुठे नाही म्हणतो, हो मित्रच होता ना तो … आज पहिल्यांदा तुला एवढं खुलतांना बघतील मी .. खरच उगाच नाही लोक मैत्रीला सर्वात उंच स्थान देत..”

नलीनीला मात्र राहून राहून असचं वाटत होतं कि हा तिच्याकडून नेमकं काय वदवून घेण्याचा प्रयत्न करतोय. ती खूप सांभाळून शब्द काढत होती.

आता एकाच भागात राहणं होतं तर नजरभेट, हाय हॅलो सुरु झाला होतं. तो दिसला आणि नितीन सोबत असला कि नलिनी अगदीच दचकायची.. तिचे श्वास वाढायचे… नितीन मात्र आवर्जून मितेशशी बोलायचा. कहीदा तर तो त्या दोघाना समोरा समोर आणून निघून जात होता.

नलीनीला तिच्या आईने एकटीनेच सांभाळलं होतं. वडिलांनी आईला सोडचिट्ठी दिली होती आणि कारण होतं विश्वास ज्याने नवरा बायकोच्या नात्यातला श्वास खेचला होता. तिच्या वडिलांनी आईवर अविश्वास दाखवत स्वतःच्या मुलीला नाकारलं होतं. सगळं सिद्ध करूनही ते नलीनीला स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारत नव्हते.  आणि सत्य कळलं तेव्हा मनस्थितीने ग्रासले गेले आणि अहंकाराने आधी मनाने आणि नंतर तनाने संपले. अविश्वासाने श्वास कोंडला होता त्यांच्या नात्याचा.

नलीनीला  कळायला लागलं तेव्हापासून नवरा असाही विचार करू शकतो  हि भावना तिच्या मनात दृढ झाली. पुढे शिक्षणात अनेक  मित्र मैत्रिणी सोबत होते आणि त्यातलाच हा मितेश, ज्यांच्यासोबत  तीच खूप जमायचं. पण त्यानेही कुठंतरी तिचा विश्वास तोडला आणि शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेला होता. नितीन तिच्या आयुष्यात आला आणि सगळं ती विसरली होती पण अचानक मितेशचं समोर येण तिला त्याच दिवसात घेवून गेलं होतं. पण त्या जराश्या मोहरण्याला तिच्याच मनातल्या शंकेने तिला ग्रहण लावलं होतं.  माझ्या मुलीनेही माझ्यासारखं बिना वडिलाच आयुष्य जगू नये असचं तिला वाटत होतं. आणि आता ती मितेशला टाळायला लागली होती. माझा श्वास गुदमरतो इथे…. असं काहीस कारण सांगून ती सारखी नितीनला फ्लॅट बदलायला सांगत होती.

इकडे मितशीलाही खूप वर्षाने नलिनी भेटली होती. खुप गप्पा करायच्या होत्या त्याला. अधिसारखं सगळं तिला सांगायचं होतं .. नवीन आयुष्यासाठी मदत हवी होती, जी ती मैत्रिण म्हणून नक्कीच करू शकते असा  त्याला विश्वास होता पण काही केल्या तिच्याशी बोलणं होतच नव्हतं त्याच. नितीनशी बोलायचं तो पण मैत्रिणीशी बोलण्याची लालसा त्याच्या मनातून जात नव्हती. एवढ्या दिवसात मितेश आणि नितीन मित्रासारखे झालेच होते.

त्या दिवशी मितेश सरळ नलीनीच्या घरी आला.. नलिनी त्याला बघताच दचकली,

“तू इथे, हा घरी नाही रे ..”

“मला तुझ्याशी खूप गप्पा करायच्या आहे.”

“पण, मला नाही ना काही ऐकायचं तुझं ..तुझं तू बघ ना!”

“असं कसं… आधी तू माझं सगळंच ऐकायची.”

“आता मला हक्काचा माणूस आहे ऐकण्यासाठी.”

“पण मला सांगायचं आहे..”

“बोल लवकर आणि निघ .. उगाच माझे श्वास वाढवू नकोस.”

“मला लग्न करायचं आहे.”

“काय ..??”

“काय बोलतोस?”

“अग हो …आणि तूच मदत करू शकतेस.”

“काहीपण .. निघ तू .. आता नितीन येणारच ..”

“बघ माझे श्वास नको ना वाढवू. तुला माहित आहे मला त्रास आहे हृदयाचा, ऐकून घे ना! “

“पण तू माझ्या नात्यातला श्वास का संपविण्यासाठी आलास?.. आता नितीन आला तर …उगाच .. विश्वासाला तडा जाईल त्याच्या .. असं तुला माझ्यासोबत एकटं बघून.”

आणि दारावरची बेल वाजली .. तिचे श्वास आणखीनच जोराने वाढले, दार उघडलं नितीन ऑफिसमधून आलेला. नलिनी खुप घाबरली .. आणि लगेच बिचकून म्हणाली, “अरे हा पिल्लूला भेटायला आला होता .. .. तू काही चुकीचा विचार करू नको हा … मी तशी नाही .. ये मितेश निघ तू आता.. “

मितेश गोंधळलाच आणि सोफ्याहून उठला तोच नितीन म्हणाला, “थांब, तू नलिनीशी बोलायला आला होता… राईट?  माझा विश्वास आहे तुझ्यावर. एवढ्या दिवसात ओळखतो मी तुला. मला जे तुझ्याकडून कळलंय ना ते तू स्वतः नलीनीला सांग. बोलून झालं कि मला फोन कर .. तिच्या मनाची घालमेल तुचं बंद करू शकतोस .. कारण विश्वास हा श्वास असतो नात्यातला .. “

आणि मग तो मुलीला घेवून बाहेर निघून गेला.

आता खोलीत मितेश आणि नलिनीच होते, मितेश, “अग आज तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो तुला, तुला मी सोडून गेलो नव्हतो .तो एक गैरसमज होता तुझा. तू माझी नेहमी मैत्रीणच होतीस. मी लग्न माझ्या आवडीच्या मुलीसोबत केलं होतं पण ती सहा वर्षाआधी बाळंतपणात वारली आणि मी परत एकटा पडलो. तिच्या प्रेमात एवढा गुंतलो होतो कि नंतर कुणी आवडलंच नाही आणि मग तू दिसलीस .. मनाला आनंद झाला .. तुझं आणि नितीनच नातं खूप समजदारीच आहे. बघून परत लग्नासाठी ओढ वाटली. आणि आज कितीतरी दिवसांनी माझ्या आईने पाठवलेल्या मुलींचे फोटो घेऊन मी तुझ्या कडे आलोय आणि मला खात्री आहे तू मला चांगला जोडीदार निवडण्यासाठी मदत करशिल जशी तू मला कॉलेजच्या दिवसात प्रत्येक वेळेस करायची… करशील ना? माझी तशीच मैत्रीण बनून. आणि हे सर्व नितीनला माहित आहे. त्यानेच तर मला लग्नासाठी तयार केलंय .. खूप समंजस आहे तुझा नवरा .. नाहीतर दुसऱ्या माणसाने बायकोचा मित्र आणि तेही तुला मी आवडत होतो हे माहित झाल्यावर मला कधी घरातही येवू दिलं नसतं, जाम खुश आहे मी तुझ्यासाठी.”

नंतर त्याने लगेच नितीनला फोन करून बोलावलं. नितीन आला तेव्हा नलिनी रडत होती. जावून बिलगली ती नितीनला.

नितीनने  तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, “श्वास तर तू माझा आहेस आणि माझ्या श्वासावर माझा विश्वास आहे. त्या भेटीत तुझी ख़ुशी भेदली होती मला जेव्हा तू मितेशशी  मॉलमध्ये बोलत होती.. आणि तुला आनंद देणारी प्रत्येक व्यक्ती मला आयुष्यात हवी आहे. तुझी एवढ्या महिण्यापासूनची मनाची घालमेल मला थांबवायची होती म्हणूंन मीच मितेशला तुझ्याशी बोलायला सांगितलं… अग वेडे, तुझा तुझ्यावर विश्वास आहे ना, मग तो माझ्यावरही ठेव ना! आणि तुझे कितीही मित्र मला पूर्ण आयुष्यात माहित झाले ना… तरीहि माझ्या नात्यातला श्वास अवघडणार नाहीच.”

आणि नंतर मितेशला मिठी मारत म्हणाला,” हा पठ्ठा अगदीच माझ्या घरी येण्याच्या वेळेवर आला आणि तू बावरलीस “

मितेश हसत म्हणाला, “अरे ऑफीस मध्ये वेळ झाला.. आणि ..तुझ्या बायकोला समजावणं म्हणजे काय असते हे तुला माझ्यापेक्षा जास्तच माहित आहे. चला आता ह्या फोटो बघून मुलगी फायनल करा ….भेटायला बोलवायचं आहे ऐकिला तरी नाहीतर माझी आई मला चांगलच  इमोश्नल ब्लँकमेल करेल ..”

“ये नलिनी चल तुझ्यासारखी मुलगी निवड बरं ..असं म्हणत त्याने मितेशला टाळी दिली .. तिघेही मितेश साठी मुलगी शोधायला लागले .. तिघातही मैत्री श्वास घेत होती आणि विश्वासाला अखंड करत होती…

मित्र मैत्रिणींनो जगातलं कुठलही नातं विश्वासच्या श्वासावरच जगत असतं… कधी तो आपल्याला ठेवावा लागतो कधी तो समोरच्याला .. 

©️उर्मिला देवेन 

धन्यवाद!!! 🙏🙏

शुद्धलेखनाच्या चुका माफ करा 🙏…. माझ्या नवीन लेखासाठी पेजला लाईक/ फॉलो करायला विसरू नका. 

———————-

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. माझे सर्व लेख कॉपी राईट्स अंतर्गत कायद्याने नमूद आहेत. लेखिकेच्या इच्छाविरुद्ध वापर केल्यास कायदेशीर शिक्षेला पात्र असाल. 

तसेच हि लिंक शेअर करायला माझी काहीच हरकत नाही. पण, पोस्ट चोरून/ कॉपी पेस्ट/एडिट करून स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या ग्रुप्सवर किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध /पोस्ट केल्यास कॉपी राईट कायद्याचे उलंघन समजून कादेशीर कारवाही करण्यात येईल. आणि आता FaceBook हे सायबर क्राईम म्हणून नोट करत. धन्यवाद!!

फोटो आभार गुगल 

Facebook Comments

You may also like...