Marathi blogs, नाते संबन्ध, प्रेम कथा

लक्ष्मी चैतन्य कळेना त्याला.

लहानपणी माझी आज्जी नेहमी गोष्टी सांगायची, त्यातली एक गोष्ट मला आज साक्षात अनुभुल्यासारखी वाटली, ती गोष्ट होती विक्रम राज्याची, विक्रम राजा, पराक्रमी, शूर, आणि अतिशय हुशार आणि वैभवशाली होता, पण त्या कथेत एक वाक्य होत जे माझ्या अजूनही लक्षात आहे. ‘विक्रम राजा भला, लक्ष्मी चैतन्य कळेना त्याला’. माझी आज्जी खुप ट्रेस देऊन ते वाक्य आजोबांकडे पाहून बोलायची. लहानपणी त्या वाक्याचा अर्थ कधीच कळला नाही पण आज्जी जेव्हाही ती गोष्ट सांगायची मला मज्जा यायची.. आज, एवढ्या वर्षानंतर राहून राहून मला त्या वाक्याचा अर्थ उलगडला.

जरा बर वाटत नव्हतं  म्हणून मी बालकनीत बसली होती, शेजारची सविता, कपडे वाळू घालत होती. तिच्या लग्नाला २ वर्षच झाली होती. मी तिला विचारलं “कशी झाली दिवाळी”, ती म्हणाली “झाली एकदाची, गेली माझा दिवाळा काढून”. मी सहज हसले, आणि मस्करी म्हणून बोलली, “काय मिळालं ग गिफ्ट मध्ये नवऱ्याकडून,” ती म्हणाली, “आहे खुप मोठासा बॉक्स, अजून नाही उघडला मी.” मला फार आश्चर्य झालं. नवऱ्याने दिलेलं गिफ्ट अजूनही उघडलं नाही. 

सतीश, नौकरी करायचा नाही, गावाकडे भरपूर शेती, वडील आणि मोठे भाऊ बघायचे. शेतीचा माल तो शहरात आणून विकायचा म्हणून शहरात राहणं. घरात सतत लक्षमीचा वास. पण घरची लक्ष्मी का उदास?

सतीश ला राजकारणात रस होता म्हणून तो सतत पार्टी च्या कामात व्यस्त असायचा, बऱ्याच दा शेतीच्या मालाच्या गोडाऊन मध्ये सविता बसायची. कुठल्याच गोष्टीची कमी नसतांना ती नाराज, निरस असायची. घरात आनंद नव्हता.

माझ्या मुलीचा खेळण्यातला चेंडू त्यांच्या आवारात पडला होता तर तो मी मागायसाठी गेले. दोघेही घरीच होत. तो पार्टी चे बॅनर रंगवत होता आणि ती TV बघत होती. मी जरा चिडवलंच “काय सतीश राव, पेढे केव्हां चारता आम्हला”.  मी त्याला लग्नाआधी पासून ओळखत होती, मग मी त्याला या सुरात बोलूच शकत होती. तो लाजला आणि निघून गेला. मला सविताने बसायला सांगितलं आणि फराळाचं घेऊन आली. फराळ खातांना मी म्हटलं “अग किती चविष्ट पदार्थ बनवतेस ग तू. फ़ारच सुंदर. मज्जा आहे सतीश ची”. ती म्हणाली “काय ताई त्यांनी तर अजून चव हि घेतली नाही. त्याना कुठे वेळ आहे माझ्यासाठी”, मला कळलं होत कि तिचा काय प्रॉब्लेम आहे.

माझ्याकडे सुट्टी होती म्हणून वेळ होताच, उगाच इकडल्या तिकडल्या गोष्टी करत मी बसले. आणि ती बोलायला लागली, “ताई, हे मला समजूनच घेत नाहीत. आता दिवाळीच बघाना, लक्ष्मी पूजनाला मी छान तयार झाले होते, पण त्याना हेही माहित नव्हतं कि मी काय नवीन घातलंय, एक मोठंसं गिफ्ट हातात दिलं आणि लव्ह यु म्हटलं म्हजे झालं का सर्व! माझ्या वाढदिवसाला काही वेळ माझ्यासोबत घालवायचा कळत नाही त्याना? बस मोठासा बुके आणि केक घेऊन यायचं आणि मग मीच त्या केक ला खायचं आणि बुके ला बघत बसायचं. हे बाहेर. परत आल्यावर सॉरी म्हणून मोकळं. काही बोललं तर मग तेच अंग जानु खुप प्रेम आहे ग तुझ्यावर, सांग काय करू तुझ्यासाठी, साडी, दागिने काय हवं तुला. रात्र बेड वर काढायची आणि परत सकाळी तू कुठचा आणि मी कुठची”. ती बोलत होती आणि मला तेच आजीचं वाक्य आठवत होत ‘विक्रम राजा भला लक्ष्मी चैतन्य कळेना त्याला’.

काय हवं असतं स्त्रीला पुरुषाकडून, नुसता पैसा आणि हक्क तिला हवं असणार सुख नाही देऊ शकत. तिला हवा असतो तो सहवास, सवांद आणि स्पर्श प्रेमाचा. मोठमोठाले गिफ्ट, संपत्ती, सगळं फिकं असतं फक्त एका शब्दाच्या आपुलकी आणि कौतूकासमोर.  ‘काय सुंदर दिसतेस ग तू आज’ हे एक वाक्य तिला वर्षभराचं अमृत देऊन जात. हक्कच्या वागणुकीपेक्षा प्रेमाचा एक क्षण  रोमरोम पुलकित करतो तिचा. आपल्या नवऱ्याला आपली काळजी आहे, हि जाणीव तिला रोज आनंदी ठेवते.

घरात सुख शांती नांदायला घरात दोन्ही लक्ष्म्या आनंदात नांदायला हव्यात, नाहीका …

पोस्ट आवडली तर जोडीने नक्की वाचा.

शुद्धलेखनाच्या चुका माफ करा

Facebook Comments

You may also like...