Marathi blogs, नाते संबन्ध, पालकत्व, प्रेरणादायक, मनातल्या कथा

‘मोनिका’ …. द वूमनहूड.

आज दहा वर्ष झाली होती मोनिकाला गावातल्या शाळेत काम करतांना. इंजिनिअरिंगची डिग्री असूनही गावातल्या शाळेत सायन्स आणि गणित शिकवायची. गावात मान होताच तिला. गावातल्या शाळेत शिकतांनाही ती नेहमी एक फरक सहज टीपायची. शाळेतल्या मुला मुलींमध्ये स्वतः आईवडिलांकडून होणार प्रेमाचा भेदभावही नजरेतून सुटत नव्हता तिच्या.

सगळं सुरळीत सुरु होतं तीच घरात आणि गावात एवढी रुळली होती कि जणू मोनिका त्याच मातीत जन्मली असंच वाटायचं. मुला मुलींना भेदभाव करणाऱ्यांना भेदक शब्दांच्या बाणाने भेदायची.  सर्वांच्या कामाला येणारी मास्तरीण बाई म्हणून सांर गावं ओळखायचं तिला. पस्तिशी ओलांडली होती, चेहऱ्यावर एक तेज होतं. ते तारुण्याच्या सेकंड इनिंगच सौंदर्य. इथवर स्व बळावर ओढलेला संसाराचा गाढा आणि मिळालेल्या प्रतिष्ठेत रुजलेला बांधा, बोलण्यात तो मास्टरी रुबाब आणि विचारात शीतलता हा तिचा स्वभाव होता….  कदाचित?  

मुलं शाळेत गेलेली, रावसाहेब कारखान्यात आणि सासूबाई देवळात, सासरे पंचायतीत आणि मोनिका स्वतःचा चष्मा डोकयावर ठेवत दाराला कुलुप लावत होती. एक मोठीशी जीप तिच्या घरासमोर येऊन उभी राहिली, जरा धूळ उडाली, मोनिकाला ठसका लागला, त्यातुंन जरा सावरत होतीच तर तिची नजर ओळखीच्या चेहऱयावर पडली, कुठेतरी बघितलं आहे,  तेवढ्यात उनाड मुलांनी भरधाव पळत नेलेली ती बाईक आणि त्यावरचं ते गाणं ….. ‘मोनिका …ओ माई डार्लिंग….डोळ्यात गेलेली धूळ साडीच्या पदराने पुसत ती  डोक्याला जोर देत होती, काही कळेना .. पण कुठेतरी बघितलं आहे .. कोण? कोण .. त्यात त्या गाण्याचे कर्कश बोल तिच्या मेंदू पटलावर पडले होते, समोर उभ्या असणाऱ्या गृहस्थाचा चेहरा आणि आताच कानातून आत कप्पे कप्पे शोधत शिरलेलं ते गाणं.. कुठे ह्या प्रश्नां मध्ये तो समोरचा गृहस्थ फाटकाजवळ आलाही. तो फाटक वाजवत होता आणि तिच्या मनात जोर जोराने घन्टा वाजत होत्या.

शाळेच्या घंटीवर घरातून लगेच पाठीला पाय लावत पळणारी लाडाची मनू कॉलेजच्या बेलवरही स्कुटी ची किक मारत सुसाट पाळायची. ते वाऱ्याशी स्पर्धा करणारे मोकळे केंस,  तो कमरेला गच्च बांधलेला ओढणीचा पल्ला … तिला कोण जिंकू शकत होतं. नाकावर क्षणात बसणार राग तिला राग वाटत असला तरी समोरच्याला तीच नाकावरचं तेज सांगून जायचं. तोच नाकावरचा राग मनात शिरून तोंडातून बाहेर निघेपर्यंत पार गोड झालेला  असायचा. जणू रागाला तिला मनात ठेवता येत होतंच.  बालपण मनसोक्त जगत तिने नुकताच तारुण्यात पाय ठेवलेला, तिच्या सावळ्या सुंदर रुपला तारुण्याची चकाकी अजूनच चंचल भासवत होती. चंचल होती पण मनाने स्थिरता होती तिच्यात. इंजिनिअरींगला असतांना मित्र मैत्रिणी खूप होत्या तिला. मित्रात तिची चर्चा नेहमीच रंगायची. ती दिसताच ‘मोनिका ओ माई डार्लिंग…’ हा सूर निघायचाच मुलांमधून.

त्या वर्गातली मुला मुलींच्या जोड्या कॉलेजपर्यंत हि पोहचल्या होत्या. आता कॉलेजच्या मुलांच्या टॉयलेट मध्येहि त्या लिहिल्या राहायच्या, मुलं एकमेकांना बघून आणि मुलींना बघून टोमणे मारायचे, मित्रा मित्रांची खेचायचे पण मुलींना ते लवकर कळत नसे. कॉलेजमध्ये चर्चा जोर खात होती कि  अंकित ची जोडी मोनिका सोबत लावली होती. तसा अंकित मोनिकाला पसंत करायचा. त्याच्या एकतर्फी मजनूगिरी वर  कॉलेजात भारी उडवा उडवी सुरु असायची, मोनिकाला कळत होतं पण स्वतःला त्या वेळणांवर वाळवायचं नव्हतं तिला. अंकित तसा नव्हता तो दुरून तिच्यावर लक्ष ठेवायचा, तिच्याशी बोलावं असं त्याला सतत वाटायचं पण कधी हिंमत करू शकला नाही. फायनल वर्षात दोघेही एकाच प्रोजेक्ट ग्रुप मध्ये होते. अंकित आणि मोनिकाचा आज रोज संबंध यायचा, बोलणं होत असायचं, प्रोजेक्टच्या विचारांची देवाण घेवाण होत असायची.

इकडे अंकित जाम खुश होत असायचा, मित्रांसोबत खोलीत असला कि नुसत्या मोनिकाच्या गप्पा असायच्या त्याच्या, तिच्या कानातल्या झुमक्या पासून तर पायातल्या सॅन्डल पर्यंत बारीक नजर असायची त्याची. त्याला कॅम्पस नंतर हॉस्टेल मध्ये मोनिका देवीचा भक्त म्हणून संबोधण्यात येत होतं.

मोनिकाला हे सर्व माहित होत असायचं पण तिने कधी त्याला खूप भाव दिलाच नव्हता पण मनातलया त्या एका कोपऱ्यात तिला गुलमोहर खुलतांना दिसायचा पण का कुणास ठाऊक तिला तो मोहरू द्यायचा नव्हता … कदाचित …

परीक्षेला महिना होता मोनिकाला  उत्तम स्थळ सांगून आलं, मुलाचा पारंपरिक व्यवसाय होता आणि घरी भरपूर शेती, शहरात थ्री बी एच के फ्लॅट, गावात ,पिढीजात वाडा, लग्नानंतर नवरा मुलगा आणि मोनिका शहरातच राहणार हे सर्वांचं ठरलं होतंच, मग प्रश्नच नव्हता. खालच्या मजल्यावर तिच्या लग्नाच्या गोष्टी होत असायच्या तर वरच्या मजल्यावर मोनिका जोरात अभ्यास करायची. परीक्षा सपंली आणि मोनिकाच्या लग्न धडाक्यात झालं.

अंकितचा पार देवदास झाला होता, हॉस्टेल वरून घरी जाण्यासाठी अजूनतरी आठवडा राहिला होता मग मित्रांच्या मैफिली आणि एकतर्फी प्रेमाचा भंग म्हणून अंकित पुरता कोलमडला होता. मोनिकाच्या मधुचंद्राच्या गोष्टी आजही अंकितच्या खोलीत ड्रिंक्स सोबत सुरु होत्या चकण्यासारख्या. रात्रभर अंकित दारूत बडबडत होता आणि सकाळी त्याच्या खोलीच्या दारावर थाप पडली. दारा मागून मुलीचा आवाज होता, अंकित … अंकित … दार उघडं  बोलायचं आहे.

अंकित सह सारेच बेसावध आणि बिनधास्त खोलीत उघडे नागडे पसरले होते, उठले आणि अंकित कडे बघू लागले

“अबे, पोरीचा आवाज साल्या!”

“बॉईज हॉस्टेल वर पोरगी ..कोण बे आणली? ..अन ते अंकितले काबे बोलावते ?

“अबे अंकीत्या हे काय बे नवीन भानगड!”

“मले काय माहित! थांब मी बघतो.. नाहीतर वॉर्डन बोंबलल.”

अंकितच्या मित्राने दार उघडलं तशी मोनिका अंकितच नाव घेत आत शिरली.. तिला बघताच सर्व लाजत खोलीतून बाहेर झाले आणि खोलीचा पहारा देत होते

अंकित तिला बघताच पूर्ण शुद्धीवर आला होता, आणि असं तिला नवरीच्या रूपात बघून मनात लाडू फुटत होते पण भीतीने काहूर मजला होता. त्याच त्याला कळत नव्हतं.

“तू इथे आणि अशी सकाळी?”

“अंकित मला माहित आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर,”

“हो पण तू अशी माझ्या खोलीत!”

“तू  तुझा देवदास माझ्या साठी केलास?”

“हो पण तू अशी इथे कशी? तुझं तर लग्न झालाय ..तू तिकडे असायला हवी ना?”

“हो पण मी आज इथे तुझ्यासमोर आहे .. तुला हेच हवं होतं ना!”

नंतर तिने त्याचा हात हातात घेतला, जरा तो सुखावला आणि दचकलाही, त्याचा दचकलेला हात परत घट्ट करत मोनिका परत म्हणाली, “मला घेऊन चल इथून… दूर निघून जाऊ आपण .. तू म्हणशील तिथे”

“अग पण तुझं लग्न झालाय!”

“तू नेशील ना मला .. मी सगळं सोडून आले रे “

“अग पण .. ?”

“तुझ्यावर विश्वास आहे माझा … हे बघ तुझ्या खोली पर्यंत एकटी आले मी ,..आणि खोलीतही आहे … मला माहित आहे तुझं प्रेम आहे माझ्यावर…”

“नेशील ना मला इथून दूर .. चल आपण पळून जाऊया.”

अंकितने तिच्याकडे स्वप्नातल्या सारखा बघत होता.

पुढ काय झालं नक्की वाचा, एका स्त्रीत्वाची कहाणी …. मनात पडलेल्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर पुढल्या भागात ओळखएका स्त्रीत्वाची …

मोनिका द वूमनहूड ..

पुढच्या भागासाठी पेजला नक्की लाईक करा https://www.facebook.com/manatlyatalyat/?

©️उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

फोटो साभार गुगल

Facebook Comments

You may also like...