नाते संबन्ध, प्रेम कथा, मनातल्या कथा

द व्हर्चुअल रिलेशनशिप! अंतिम भाग.

पहिला भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13661/

ती रात्र तशीच गेली रंजूची, नकोनको त्या विचाराने ग्रासलं होतं मन तिचं.  मधेच मुलाला कवेत घेत होती आणि तिचा हुंदका दाटत होता पण रडावस वाटत नव्हत. किळस येत होती स्वतःची कि त्याची कि त्या घाणेरड्यापणाची. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. मुलाला खुशीत घेवून जरा वेळ मन झोपी गेलं होतं. सकाळी राजनने आवाज दिला, "ऑफिसला उशीर होतोय, काही चहा नाश्ता मिळणार कि नाही?"

रंजू खळबळून उठली, मनातच पुटपुटली, "नाश्ता हि मोबाईल मधून मागवा, आणि खा की तोही पाठवता यतो कि स्टिकर्सने!" ती बेडवरून उठली, सर्व आवरून स्वयंपाक खोलीत शिरली. राजनने tv लावला पण बघत मात्र नव्हताच, त्याचं सुरु झालं होतं मोबाईलच्या बटणावर हात फिरवणं. कधी हसत होता तर कधी नजरेने दाद देत होता.

त्याच्या त्या वागणुकीला बघून रंजू त्याला म्हणाली, "मलाही हवाय आता असा मोबाईल, मस्त असतो, सर्वांमध्ये असूनही आपल्याच तालात राहता येतं. नाही का?"

तिला अस बोलतांना बघून राजनच लक्ष तिच्यावर पडलं, "काय? तुला समजते तरी काय! आणि करायचं तरी काय ग तुला असल्या मोबाईलने? ना नौकरी आहे ना मित्र मैत्रिणी. काही भेटणार नाही. तो डबीचा मोबाईल आहे ना, फोटो निघतात त्यात, पासवर्ड बदलू शकतेस अजून काय हवं."

"अहो, फेसबुक नाही ना त्यात, ते काय ते whatsअप नाही ना, द्या ना घेवून मलाही."

"गप्प बस, तू तुला कशाला हवा? रिकामटेकडी, आली मोठी. नाश्ता दे लवकर, निघायचं आहे मला, मी अंघोळीला जातो तोपर्यंत सर्व टेबलवर लाव."

राजन मोबाईल घेवूनच अंघोळीला गेला. आता मात्र कहर झाला होता. येताच त्याने नाश्ता केला आणि आतल्या खोलीत जरा काही शोधायला म्हणून गेलेला. तेवढच वेळ तो रंजूला मिळाला. मोबाईल तिला दिसला, तिने उचलला पण पासवर्ड बदलला होता आणि राजनही खोलीतून येत होता. तिने परत मोबाईल तसाच ठेवला. राजनला दिसली तर तो म्हणाला, "काय ग काय बघतेस?"

"अहो काही नाही, टेबल पुसत होते."

राजन मोठ्या मस्तीत घरातून निघून गेला. आणि रंजू मुलाचं करत विचारात चूरमळत राहिली.मनाला विचाराने  चुरघळता चुरघळता आकुंचन पावलेल्या मनाने अचानक मोठं व्हावं असंच काही झालं आणि तिच्या मनात विचार फिरू लागले. उठली, कपाट उघडलं, कपाटाच्या कोपऱ्यात पेपरच्या खाली एक कागदी लिफ़ाफ़ा होता, तो तिने अलगत ओढला. त्यातून जमा केलेले पैसे काढले, मोजले, पंधरा हजार जमले होते. पैसे हातात घेऊन विचारात होती तर तिची जुनी मैत्रीण घरी आली.

"रंजू रंजू .. आहेस का घरी?"

"हो हो, ये ये, अगदीच वेळेवर आलीस, आता येणार होते तुझ्याकडे."

"का ग , कशी आठवणं झाली होती माझी आज? कि काम आहे काही, नाही म्हटलं तू कामाची, काम असल्याशिवाय आठवणं करणार नाहीस."

"ये मिथाली,  काहीही काय ग, तूच आहेस मला ह्या गावात आपल्या गावाची. मला मोबाईल घायचा आहे."

"घे कि, चल जावूया."

"पण पैसे नाहीत ग तेवढे, पंधरा हजार आहेत, कितीला मिळतो ग?"

"भेटेल ग नाहीतर जरासा सेकेंड हँड पण मिळतो ... आणि तुला का हवाय? तूच तर मागे बोलली होती... नकोय म्हणून."

"पण आता हवाय ना, प्लीज."

[the_ad id="13235"]

दोघीही मोबाईल घ्यायला गेल्या, एक बऱ्या पैकी मोबाईल रंजूने बजेट मध्ये घेतला, जरा सेकेंड हँड घेतला पण सर्व सोशल अँप्स अपलोड करून घेतले. घरी आली, मिथाली साठी चहा केला आणि बोलता बोलता तिच्याकडून फेसबुक समजून घेतलं. एक अकाउंट तयार केलं, रेवती नावाचं, इकडून तिकडून जमवून प्रोफाइल फोटो अपलोड केला. समजत नव्हतं मग दोन एक दिवस लागणार होतेच तिला सगळं समजायला. मोबाईल लपून घरात ठेवून दिला.

राजन नेहमीप्रमाणे घरी आला, आणि त्याचा तोच प्रकार सुरु झाला, सोफयावर पाय ताणून बसला आणि बोटांनी मोबाईलच्या बटणा दाबत होता. रंजू कधी जवळून जाताच मोबाईल लपवायचा, तर कधी मोबाईल घेऊनच टॉयलेटला जायचा. टॉयलेट तर अगदीच त्याचं दुसरं प्रिय स्थळ होतं. मनसोक्त वेळ घालवायचा. जेवणाच्या ताटावरही तेच सुरु असायचं. गालात हसणं, स्वतःला गर्वाने उगाच फुगवणं, कधी रंजू कडे रागाने बघणं तर कधी तिला एकतार बघणं. दोन दिवसात रंजू वैतागली होती. पण तिलाही आता फेसबुक कळत होतं. राहिली होती ती अंतिम परीक्षा राजनची ! तिला कळून चुकलं होतं कि हे समजवल्याने त्याच्या मेंदूतून काहीही हलणारही नाही, मनात पुटपुटली, "इलेकट्रिक शॉक सारखा धक्का द्यावा लागेल. घरात सर्व नीट असतांना बाहेर कसली भीक मागतो हा माणूस, नसणाऱ्या नात्यासाठी असणाऱ्या नात्यांना छळतोय हा माणूस. कही  महिने झाले मला साधं लव्ह यु म्हटलं नाही आणि मॅसेज वर किस पाठवतो, आणि  समोरून रिप्लाय आला कि छाती ताणतो. घाणेरड्या घाणेड्या गोष्टी करतो आणि माझं मात्र शरीर पिळतो. ते काही नाही ह्याचं रिलेशन स्टेटसच बदलते आता."

दोन दिवसांनी तिला राजने फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवली, तो ऑफिस मधेच होता, तिने ती स्वीकारली आणि रंजूच हृदय धडधडायला लागलं. संघ्याकाळपर्यंत राजनचे हाय, हॅलो चे कितीतरी मॅसेज येऊन गेले पण रंजूची काही हिंमत झाली नाही उत्तर देण्याची.

एक दिवस असाच गेला. पण राजन मात्र तिला रोज शुभ सकाळ, शुभ संध्या अशे मॅसेज करायचा. आता त्याने तिला तू खूप सुंदर आहेस असंही लिहिलं. आता मात्र रंजूचा पारा चढला. ती आतल्या खोलीत मुलाला झोपवत होती आणि तो नेहमीप्रमाणे टीव्ही सुरु ठेवून मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेला होता.

राजनची खरी मानसिकता आता तिला बघायची होती, तिने मोठया हिमतेने त्याला 'हाय' लिहिलं. आणि राजन घरातच आनंदाने ओरडला. लक्ष होतं रंजूच पण ती जरा शांत होती. मग भराभर मॅसेज येत गेले. रंजूला लिहायलाही जमत नव्हतं तेवढ्या वेगाने समोरून मॅसेज येत होते.

[the_ad id="13207"]

"जेवलीस का ग ?"

"तू खूप सुंदर आहेस."

"अजून जागी आहेस."

"ये तुझं लग्न झालंय का?"

"तुझा फेस फोटोजनीक आहे, मॉडेलिंग करतेस काय ग?"

"ये बोलना .. गप्प का आहेस. आवडलं नाही का तुला?"

रंजूला हे सगळं वाचन दाटून आल्या सारखं झालं. तिने मोबाईल उशी खाली लपवला आणि समोरच्या खोलीत आली, ती येताच राजन तिच्याकडे बघून काहीही झालं नाही असा भाव दाखवत हसलाच.

तीही राग दाबून हसली, "काय हो हे फेसबुक ना, मलाही शिकवा बर, मिथाली  सांगत होती, जुने मित्र मैत्रिणी मिळतात म्हणे ह्यावर, गप्पा पण करता येतात म्हणे."

फेसबुकचं नाव घेताच राजन कावरा बावरा झाला, तो तसाही त्याच्या मॅसेजला अजून उत्तर आलेलं नाही म्हणून बैचेन होता आणि त्यातल्या त्यात रंजू त्याला नको ते प्रश्न विचारात होती, वचका धरल्या सारखा म्हणाला, "ये तुला कसल्या आल्या ग चौकश्या? आधी घर आणि मुलं सांभाळ. धड घर सांभाळता येत नाही आणि आली मोठी मोबाईल वाली, काय फालतूपणा असतो काय ग? कामासाठी वापरावा लागतो. इंटरनेटला पैसे लागतात, ते काय तुझा बाप देणार आहे. झोप जा नाहीतर परत उद्या उठायची नाही."

रंजू ने सर्व राग गिळला, तिचं मन त्याच्या ह्या वागण्याने आधीच मेलं होतं पण थोडी  उमीद होती कि सुधारेल...पण राजन तर तिला पूर्ण डूबलेला दिसत होता आणि बाहेर निघायलाही तयार नव्हता.

ती आतल्या खोलीत आली, मोबाईल उशीखालून काढला, बघितला तर कितीतरी मॅसेज होते...  तिने परत 'हाय' टाकला.

"बापरे, किती वेळ हो, मला वाटलं झोपली तू "

"नाही अजून"

"एकट्या आहात"

"हो"

तिने मोबाईल ठेवून दिला. आता रोज राजन तिला मॅसेज करायचा, नीती नियमाने घरात सर्व सुरु होतं. नवरा बायको एकेमकांशी संवाद करत नव्हते ते अनोळखी होऊन मोबाईलवर बोलायचे. रंजूला कळत नव्हत राजन नेमकं काय शोधतोय अश्या नात्यामध्ये जे खोटं आहे. तरीही तिला त्याच्या वागणुकीचा अंत बघायचा होता. ती ओळखतो काय तिला हे तिला जाणून घायचं होतं. घरात लग्नाची बायको असतांना व्हर्चुअल नातं ठेवायला आवडावं हा कसला वेडेपणा आहे हे तिला असह्य होतं.

आठ दिवसाच्या मॅसेज च्या खेळा नंतर राजन रोज मॅसेजवर रंजुशी रेवती समजून बोलायचा. रंजू मात्र त्याच्या विचित्र पणाला कंटाळली होती. त्या दिवशी संध्याकाळी राजन घरी आला, आणि रोजच्या प्रमाणे सर्व सुरु झालं, जेवतांना रंजू ने सहज विचारलं, "मला माहेरी जायचं आहे."

फोनमधून डोकं बाहेर काढतच राजन म्हणाला, "कधी जातेस?"

"परवा निघावं म्हणते, बाबाला बर नाही असा फोन येऊन गेला दुपारी."

"ठीक आहे जा ..."

जेवणं आटोपली होती आणि रंजू मुलाला घेऊन आतल्या खोलीत गेली, मोबाईल काढला, खूप मॅसेज होते, तिने राजनच्या मॅसेज वर उत्तर दिलं, "हाय"

समोरून लगेच उत्तर आलं, "हाय, कशी आहेस?"

"तू खूप सुंदर आहेस"

"थँक्स"

"कुठे राहते"

"तू कुठे राहतो"

राजन घराचा पूर्ण पत्ता सांगून मोकळा झाला होता, तिने उत्तर दिलं, "अरे जवळचं राहतो तू माझ्या."

"मग, काय म्हणणं आहे, भेटायचं का?"

रंजूने उत्तर दिलंच नाही .. वचाराने कावरी बावरी झाली होती, अनोळखी बाईला भेटायला बोलावतो, काय टाईम पास करतो काय हा कि काय हवंय याला सर्व असतांना.

दुसऱ्या दिवशी राजनने तिला त्याचे देखणे आणि रुबाबदार फोटो पाठवले, बुके पाठवला. खुप सारे किसेस आणि लव्ह यु लिहून पाठवलं .. मॅसेज वर हो !

रंजूने म्हणजे रेवतीने उत्तर दिलं नाही तर मग परत लिहून पाठवलं, "ये रुसलीस काय ? तुझा सुंदर फोटो पाठव मला, आता बैचेन झालॊय मी तुला बघण्यासाठी."

राजनच्या प्रत्येक मॅसेजने रंजूच्या मनात भूकंप येत होता. मनातल्या भूकंपाने झालेला पसारा तिला आवरणे अवघड होत होते. तरीही तिला तो पसारा आवरायचा होता.

रात्रीचे दोन वाजले असतील, रंजूने  हळूच आतल्या खोलीतल्या बेडवरुन डोकावलं, राजन अजूनही मोबाईलवर डोळे ठेवून होता. तिने तिचा मोबाईल उशी खालून काढला. लगेच मॅसेज आला, "तू अजून झोपली नाहीस .. माझा विचार करतेस .. मीही तुझा करतोय."

रंजूने परत टाईप करता करता हात थांबवले. आणि समोरून मॅसेज आला, "मला माहित आहे तुला का झोप येत नाही ते ... ये तुझा तो फोटो पाठव ना वरचा वाला .. आता बघितल्या शिवाय डोळा लागणार नाही."

रंजूला असा राग आला होता कि समोरच्या खोलीत जाऊन चांगलं झाडूने मारून काढावं पण ती हेही जाणून होती हि खोड लाथा बुक्याने जाणार नाही तर ह्याला इलेक्ट्रिक शॉकच हवा.

सकाळी उठताच तिने निघण्याची तयारी सुरु केली, इकडे राजनचा शुभसकाळ वाला संदेश रेवतीला पोहचला होता .

नंतर साडी बदलायला खोलीत गेली आणि तिने राजनला मोबाईलवर 'हाय' लिहिलं, बस राजनचे धडा धडा मॅसेज सुरु झाले. शेवटचा होता, तुझा नंबर सांग, तू आवडतेस मला, तुझ्याशी बोलायचं आहे, love you jaanu....

बसं, रंजुने नंबर दिला आणि सामान घेवून निघण्यासाठी समोरच्या खोलीत आली, लपून टेबलवर मोबाईल ठेवला. तिचं लक्ष पडताच राजन तिला म्हणाला, "मला जरा एक ऑफिस मध्ये अर्जंट कॉल करायचा आहे." अस म्हणून तो घरच्या अंगणात गेला. इकडे तो जस जसा रिंग द्यायचा मोबाईल घरात वाजायचा. राजन थकला आणि मोबाईल लावता लावता घरात शिरला, तो शिरताच रंजुने मोबाईल उचलला,

तिने मोबाईल उचलला आणि  राजनच्या हातून त्याचा मोबाईल पडला. मुलाला घेवून ती त्याच्या समोरून निघून गेली. आठ दिवसांनी तिने त्याला कोर्टाची नोटीस पाठवली, मोबाईल मध्ये पुरावे तिच्या कडे होतेच, तिला व्हर्चुअल रिलेशन  ठेवायचं नव्हत. ज्याची राजनला सवय झाली होती.

समाप्त ...

व्हर्चुअल रिलेशनशिप समाजाला लागलेली कीड आहे, नजरे वर नजर पडली कि साधा हात उचलून हाय सुद्धा न करणारे fb, whats app वर मॅसेज करून करून त्रास देत असतात. त्यातल्या त्यात तर मुलीचं account असलं कि विचारूच नका ...

©उर्मिला देवेन

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

फोटो साभार गुगल.

नवीन कथेसाठी पेजला नक्की लाईक करा.

 

 

You may also like...